Pune News : पुणे-पिंपरी चिंचवड हादरलं! विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर
Pune News : विषारी दारू प्यायल्यानंतर अनेकांना तोंडाला फेस येणे, उलट्या होणे आणि अचानक प्रकृती खालावल्याची लक्षणे दिसून आली. काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी स्पिरिटयुक्त गावठी दारूमुळे मृत्यूंचा आकडा १३ वर पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील काळेपडळ भागात तीन तर हडपसर परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारू प्यायल्यानंतर अनेकांना तोंडाला फेस येणे, उलट्या होणे आणि अचानक प्रकृती खालावल्याची लक्षणे दिसून आली. काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे हा सराईत अवैध दारू विक्रेता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने तयार केलेली स्पिरिटयुक्त विषारी दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांत विक्रीसाठी पुरवल्याचा आरोप आहे.
गेल्या ४८ तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये फुगेवाडी परिसरातील अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी आणि भीमाप्पा बसवंत पुजारी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वायसीएम आणि मेडीपॉईंट रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
दरम्यान, परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी संपूर्ण घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत वेगळा दावा केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.





