Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ई-केवायसीनंतर तब्बल ‘इतक्या’ महिला लाभार्थी ठरल्या अपात्र
Ladki Bahin Yojana : महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे ही प्रमुख अट आहे. याशिवाय इतर पात्रता निकषही निश्चित करण्यात आले होते.

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ई-केवायसी पडताळणी आणि पात्रतेची छाननी पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून सरकारच्या खर्चातही लक्षणीय कपात होणार आहे.
जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ सुरुवातीला सुमारे 2 कोटी 46 लाख महिलांना मिळत होता. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेनंतर आणि पात्रतेच्या निकषांची पडताळणी झाल्यानंतर ही संख्या आता 1 कोटी 66 लाखांवर आली आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे ही प्रमुख अट आहे. याशिवाय इतर पात्रता निकषही निश्चित करण्यात आले होते. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी मोहीम राबवण्यात आली होती. काही महिलांकडून प्रक्रियेदरम्यान चुका झाल्याने दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण न केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : LPG Rate Today: घरगुती सिलेंडरची आज किमत किती? ; वाचा नवीन किंमत
दरम्यान, या योजनेतील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात.
मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते 13 व 14 मेपासून वितरित करण्यात आले होते. त्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची उत्सुकता महिलांमध्ये वाढली आहे. 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर योजनेचा आर्थिक भार कमी होणार असला, तरी या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा : Sobhita Dhulipala : “…त्यामुळे अशा गोष्टी फार मनावर घेण्याची गरज नसते”; प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत






