Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे. या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली. याशिवाय नगरविकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोशल वॉररुमची विशेष बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांशी निगडित चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण असूनही त्यांनी दांडी मारली.
एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीमागील नेमकं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच त्यांनी आज दोन विभागांची आढावा बैठक बोलावली होती. ती बैठक देखील रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये नगर विकास विभागाचे आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक त्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात देखील मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. त्यामध्ये देखील एकनाथ शिंदे प्रत्यक्षपणे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक किंवा आत्ताच्या झालेल्या या बैठकांना त्यांची अनुपस्थिती असणं हा चर्चेचा विषय बनला आहे. या महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने त्यांच्यामध्ये अजूनही नाराजी आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
या कारणांमुळे एकनाथ शिंदे नाराज?
नवीन सरकारमधील खातेवाटपावरून आणि पालकमंत्रिपदावरून वाद आहेत. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. असं असतानाही महायुतीतील आणि सरकारमधील वाद शमविण्यात प्रमुख नेत्यांना यश आलेले नाही. सरकारमध्ये आपली गळचेपी होत असल्याची भावना शिवसेनेच्या काही मंत्र्यांमध्ये आहे.
त्यामुळे या कारणावरून नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. मागील महिन्यातच एकनाथ शिंदे नाराजीतून मूळगावी गेले होते. आता देखील मुख्यमंत्र्यांनी प्रमुख बैठक बोलावलेली असतानाही एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून एकनाथ शिंदे यांचे दिवसभरात कोणतेही कार्यक्रम नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत.





