Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक ! बेळगावमध्ये 12 मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्रात सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंगचा जोर वाढला आहे. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षबदल करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, कर्नाटकातील बेळगाव येथे एका महत्त्वपूर्ण घडामोडीत १२ मठाधिपतींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दत्त गगनगिरी ध्यानमंदिराचे मठाधिपती प. पू. पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली चिकोडी येथील या मठाधिपतींनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे बेळगावात शिवसेनेची ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आनंद आश्रमात मठाधिपतींसह अनेकांनी केला शिवसेनेत प्रवेश
ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प. पू. पुरुषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी, नूतन धनावडे, बाळकृष्ण कांबळे, सुवेल शेट्टे, मयूर गुरव, साई पाटील, अनिकेत वरके, सुषमा खरात, दीपा फडणवीस, अरविंद शिरळाकर, दादा महाराज आणि अजय घराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सोहळ्याने शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांना साधुसंतांचा पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. “मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत,” असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
हिंदुत्व आणि साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीर
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्र हा साधुसंतांचा देश आहे, पण महाविकास आघाडीच्या काळात दोन साधूंची हत्या झाली,” असे त्यांनी नमूद केले. शिवसेना साधुसंतांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे काम साधुसंतांच्या आध्यात्मिक नेतृत्वातून होत आहे, असे ते म्हणाले. “राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान श्रेष्ठ आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठे असते असे मानणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्याकडून जे शक्य होते, तेच मी पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी आणि आध्यात्मिक गुरुंसाठी केले असल्याचे याप्रसंगी विनम्रपणे नमूद केले. तसेच हे कार्य यापुढेही करत राहू असेही अधोरेखित केले.… https://t.co/B7RniBdorU pic.twitter.com/MLcybr8bJm
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 3, 2025
शिंदे यांनी शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार अधोरेखित करताना विरोधकांवरही निशाणा साधला. “महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार होता. मात्र, काहींनी हिंदुत्व सोयीचे केले आणि सनातन धर्माची प्रतारणा केली. जनतेने त्यांना धडा शिकवला,” अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटावर केली. “शिवसेना आणि साधुसंतांचे विचार एकच आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया,” असे आवाहन शिंदे यांनी केले. साधुसंतांच्या पाठिंब्याने शिवसेना अधिक बळकट होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.





