Eknath Shinde : जय गुजरातवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; शरद पवारांकडे दाखवलं बोट !

Uday Samant | Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील कार्यक्रमातील भाषणावेळी ‘जय गुजरात..’ म्हटल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते आणि शिंदेंनी अमित शहांचे तोंड भरून काैतुक केले. भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात..” अशा घोषणा दिल्या.
अगोदर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हटले आणि त्यानंतर थांबले आणि मग जय गुजरात अशी घोषणा दिली. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर सडकून टिका केली. शिवसेना उबाठा गटाने आता बाळासाहेब ठाकरेंचे विचार कुठे गेले ?म्हणत शिंदेंवर टिका केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी हा वाद पेटला आहे. शालेय अभ्यासात त्रिभाषा सूत्राबद्दल राज्य सरकारने दोन जीआर काढले होते. पण याविरोधात कायम विरोधात असलेले दोन भाऊ राज्य सरकारविरोधात एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला.
त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारला त्रिभाषा सूत्राबद्दलचा जीआर मागे घ्यावा लागला. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषा असं सूत्र असावं, असं विरोधकांनी निश्चिय केला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रसह जय गुजरात अशी घोषणा केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे यावर आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
उदय सामंत म्हणाले की, फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. हा पक्षाचा किंवा सरकारी कार्यक्रम होता का? हा गुजराथी समाजाचा कार्यक्रम होता. ते जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणाले. मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. तिथे भाषण संपवताना शरद पवार साहेब जय कर्नाटक बोलले होते. काही लोक फेक नरेटिव्ह पसरवतात, पण त्याचा काही परिणाम होत नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे.





