फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे ठरले सरस.! शंभर दिवसात चांगली कामगिरी करणाऱ्या विभागाची आकडेवारी समोर

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अव्वल स्थान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या आढावा कार्यक्रमात आठ विभागांनी अव्वल कामगिरी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन विभागांचा समावेश आहे. या आठ विभागातून पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शंभर दिवसांचा आढावा कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीच्या वतीने प्रत्येक विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले.
या लेखा परीक्षणात 59 विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. या आठ विभागातून सर्वात चांगले पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत. विशेष म्हणजे या आठ विभागांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वाधिक विभागाचा समावेश आहे.
क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने चांगली कामगिरी करणाऱ्या आलेल्या विभागाची आकडेवारी पाहिली तर यामध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. या आठ विभागांपैकी शिंदे यांच्या मंत्र्याकडे असलेल्या पाच विभागांचा समावेश आहे. तर दोन विभाग हे भाजपचे तर एक विभाग हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा आहे.
शिंदेंच्या मंत्र्यांचे पाच विभाग
या अव्वल ठरलेल्या आठ विभागांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभाग, प्रकाश आबिटकर यांचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उदय सामंत यांचा उद्योग विभाग यासह एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण विभागाचा देखील समावेश आहे.
गोरेंची कामगिरी अव्वल
भारतीय जनता पक्षाचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला ऊर्जा विभागाने यामध्ये स्थान मिळवले आहे. तर त्यांच्याच पक्षाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास विभागाने देखील यामध्ये स्थान मिळवले आहे.





