अजित पवारांमुळे शिंदेंची अडचण? मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास ३ पर्याय…

Eknath Shinde CM – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरी यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंच्या पुढील राजकीय कारकिर्दीचे काय, याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांना राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद न दिल्यास भाजप त्यांच्यासमोर कोणते पर्याय ठेवू शकते आणि शिंदे यांच्याकडे आणखी कोणते पर्याय आहेत जाणून घेऊयात…
केंद्रात मंत्रीपद | Eknath Shinde CM
जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, तर त्यांना केंद्रात महत्त्वाचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडे अशा नेत्यांसाठी केंद्रातील राजकारण हा नेहमीच प्रभावी पर्याय राहिला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कृषी मंत्री करण्यात आलेले, तर आसामचे सर्बानंद सोनोवाल यांनाही केंद्रात मंत्रीपद देण्यात आले होते.
याच पद्धतीने, शिंदेंनाही एखादे महत्त्वाचे मंत्रालय दिल्यास त्यांची मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या खंत कमी होऊ शकते. हा पर्याय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या सोयीस्कर आणि प्रतिष्ठेचाही असेल.
राज्यात उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार | Eknath Shinde CM
जर शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातच सक्रिय राहू इच्छित असतील, तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे हा पर्याय देखील त्यांना उपलब्ध असेल. असे केल्यास ते महाराष्ट्राच्या सत्तेत थेट सहभागी राहतील, महत्त्वाची खाती सांभाळू शकतील आणि त्यांच्या पक्षाला बळकट देखील करू शकतील.
फडणवीस यांनीही बंडानंतरच्या महायुती सरकारमध्ये पूर्वी मुख्यमंत्रीपद भोषवले असतानाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. यामुळे शिंदे आणि फडणवीस खांदेपालट करून महायुतीला अधिक मजबुती देऊ शकतात. फडणवीस यांच्या उदाहरण ताजे असल्याने डिमोशनमुळे शिंदेंचा ईगो दुखावला जाण्याचा प्रश्न दुय्यम ठरतो.
समर्थन मागे घेणे | Eknath Shinde CM
तिसरा पर्याय म्हणजे शिंदे यांनी महायुतीचा पाठिंबा काढून बाहेर पडणे. मात्र, राजकीय तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय शिंदेंसाठी घातक ठरू शकतो. महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. एकट्या भाजपला बहुमताच्या आसपासचा कौल मिळाला आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील सोबत असल्याने, शिंदेंनी समर्थन मागे घेतले तरी भाजप बहुमताचा आकडा आरामात पार करेल.
एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा हातमिळवणी करतील अशी शक्यता तर जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीय आत्मघातच ठरेल.
शिंदेंची बार्गेनिंग पॉवर अजित पवारांमुळे कमी | Eknath Shinde CM
एकनाथ शिंदे यांच्या बदनानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले होते. अजित पवार हे देखील पुढे महायुतीचा भाग झाले. मात्र अजित पवार यांचे महायुतीत येणे शिंदेंच्या सेनेतील नेत्यांना रुचले नव्हते. विधानसभा निवडणुकांमध्ये देखील अजित पवारांमुळे सेनेच्या वाट्याला कमी जागा आल्याची नाराजी होती.
निकलनमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून एकट्या भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या जवळ असलेल्या भाजपला अजित पवार यांची साथ असल्याने शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील याची जाहीर कबुली दिली आहे.





