महायुतीत मिठाचा खडा…; एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना पुन्हा निरोप

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुका ग्रासरूट लेव्हलच्या असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्त्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी. तसेच रविंद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केले होते, आजही करतो की प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये बेबनाव होईल असे कृत्य, वक्तव्य करू नये असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेले पाहिजे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत राज्याच्या विकासाबाबत आणि अलीकडील पूर परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच पंतप्रधानांनी केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पुढे मुरलीधर मोहळांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून रविंद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का? असा थेट प्रश्न माध्यम प्रतिनिधिंनी विचारला असता शिंदे म्हणाले की, धंगेकरांकडे जो पक्षाचा निरोप जायचा होता तो गेला आहे. धंगेकरांचे जे काही वक्तव्य आहे त्यासंबंधी मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतीलही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिहार निवडणुकीबाबत शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितले की, एनडीए गटबंधन निश्चितच बहुमताने विजय मिळवेल. मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि मोदी नेहमी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात, असेही शिंदे यांनी सांगितले.





