Eknath Khadse : भाजप प्रवेशाचा विषय आता संपलेला; एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण
माझा वैयक्तिक भाजप प्रवेशाचा विषय आता संपलेला आहे. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि या पुढेही त्यांच्यासोबतच राहणार आहे. मात्र, माझ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली.

Eknath Khadse : माझा वैयक्तिक भाजप प्रवेशाचा विषय आता संपलेला आहे. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि या पुढेही त्यांच्यासोबतच राहणार आहे. मात्र, माझ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणूकीआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच मला दिल्लीत बोलावून घेत भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले होते, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट घेतली होती. या भेटीसंदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या तर्त-वितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. याचपार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ खडसे म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करण्यात मला आता कोणताही रस नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. माझ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये जाण्याची इच्छा असू शकते, पण मला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
गिरीश महाजन आज मोठे नेते असल्याचा आव आणत आहेत. पण एक काळ असा होता की, त्यांना भाजपचे तिकीट मिळावे म्हणून मी स्वतः प्रयत्न केले होते. यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जामनेर व भुसावळ मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आली होती. तसेच मंत्री होईपर्यंत त्यांना सर्व प्रकारची मदत मी केली. मात्र, आज ते हे सर्व विसरले आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली.
तसेच देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंतच गिरीश महाजन यांचे अस्तित्व आहे. ज्या दिवशी फडणवीस त्यांच्या डोक्यावरून हात काढतील, त्या दिवशी महाजन कशातच राहणार नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
दरम्यान, विनोद तावडे यांच्या भेटीचे कारण सांगताना एकनाथ खडसे म्हणाले, माझ्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार, विनोद तावडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. हे सर्व नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षाही एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केली.






