Sanjay Raut : “…तर कदाचित एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल”; संजय राऊतांनी स्पष्ट सांगितले
Sanjay Raut : 'महाराष्ट्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहिलेला नाही'

Sanjay Raut : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावरून सध्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन देवेंद्र फडणवीस यांना तेथे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत मी हे कालही म्हटलं होतं. मी माझ्या मताशी ठाम आहे. शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर केला गेला. त्यांना फोडून त्याची बक्षिसी म्हणून मुख्यमंत्री केलं. त्यांचं काम करुन झालं आहे.”
‘महाराष्ट्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहिलेला नाही’
तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “केंद्रात जर बदल झाले आणि नरेंद्र मोदींना वाटलं की देवेंद्र फडणवीस एखाद्या खात्याचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत, आम्हाला तर वाटतं की १०० टक्के ते योग्य आहेत. कारण महाराष्ट्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहिलेला नाही. महाराष्ट्रात गुंडाचं राज्य सुरु झालं आहे. Sanjay Raut
फडणवीस जर केंद्रात गेले आणि त्यांना अर्थखातं मिळालं तर मग महाराष्ट्रात भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. बाहेरचा मुख्यमंत्री होणार नाही. एकदा केलं त्यांना पक्ष फोडला म्हणून परत नाही करणार कारण ती भाजपाची परंपराच नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
…तर कदाचित शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल
“जसं शिंदे म्हणतात ना शिवसेनेची स्थापना मी केली मी संस्थापक आहे. तसं उद्या ते भाजपात गेले आणि सांगितलं की भाजपाची स्थापना मी केली, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे माझे कार्यकर्ते होते. नरेंद्र मोदी कार्यकर्ते होते. अमित शाह कल का बच्चा. असं जर का ते म्हणाले तर कदाचित त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल. बाहेर राहून त्यांना काहीही मिळणार नाही,” असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे सक्षम नेतृत्व असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Sanjay Raut
हेही वाचा:






