IAS Transfer : राज्यातील आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नवल किशोर राम PMO मधून थेट पुण्याचे आयुक्त

मुंबई : राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडाका सुरूच असून आताही आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चंद्रकांत डांगे यांची मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात सहसचिव पदावर, तर पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या तुकडीचे अधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रीडा आणि युवक विभागाच्या आयुक्त म्हणून शीतल तेली -उगले यांची नेमणूक करण्यात आली आहे. धुळ्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर यांची छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची बदली मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
सिडको, छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची नियुक्ती धुळे जिल्हाधिकारी या पदावर झाली आहे. अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख विभाग पुणे येथील अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांची बदली अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
पुणे महापालिका आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती
विद्यमान पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे येत्या दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी पालिका आयुक्त म्हणून राज्य शासनाने नवलकिशोर राम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. राम हे यापूर्वी पंतप्रधान कार्यालय येथे कार्यरत होते.
राम यांनी यापूवी 2018 मध्ये पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. राम हे मूळ बिहारचे असून, 2008 च्या बॅचचे ते महाराष्ट्र संवर्गातील आयएएस अधिकारी आहेत. राम यांनी यापूर्वी नांदेड येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
त्यानंतर त्यांची 2018 मध्ये पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये त्यांनी 2019 मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती यशस्वीपणे हाताळली होती. 2020 मध्ये करोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 2020 मध्येच राम यांची यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात उपसचिव या पदावर करण्यात आली होती.
मागील पाच वर्षांपासून ते या कार्यालयाची जबाबदारी सांभाळत होते. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात येऊन ते पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत आले. त्यानंतर बुधवारी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती पुणे महापालिका आयुक्तपदी करण्याचे आदेश जारी केले आहेत. राम हे दि. 31 मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
1. नवल किशोर राम (IAS:RR:2008) – आयुक्त, पुणे महानगरपालिका
2. शीतल तेली-उगले (IAS:RR:2009) – क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे
3. जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) – विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर
4. सी.के. डांगे (IAS:SCS:2010) – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
5. सौरभ कटियार (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा
6. भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) जिल्हाधिकारी, धुळे
7. आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद
8. आशिष येरेकर (IAS:RR:2018) जिल्हाधिकारी, अमरावती





