लॉकडाऊनमुळे घटलेले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

प्रशासकांनी मागविल्या उपाययोजना
पुणे – करोना काळात घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी आणि खर्च कपातीसाठी पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी विभाग प्रमुखांकडून उपाययोजनांबाबत अहवाल मागविला आहे.
लॉकडाऊन काळात बाजार समितीचा मुख्य बाजार आवारातील भुसार बाजार वगळता इतर विभाग आणि उपबाजार दोन महिने बंद होता. या काळात संबंधित विभागाचे उत्पन्न घटले आहे. तर, पणन संचालनालयाने 10 ऑगस्ट रोजी आदेश काढून शेतमाल नियमनमुक्त केले आहे. परिणामी समितीचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढ आणि प्रत्येक विभागातील खर्च कमी करण्यासाठी उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना गरड यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.
याबाबत प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, बाजार समितीचा पेट्रोल पंप भाडेतत्त्वावर चालवायला देण्याचा विचार आहे. सर्व विभागांत पाणी आणि लाईट वापरासाठी स्वतंत्र मीटर बसविले जाणार आहेत. मनुष्यबळाचे गरजेनुसार विभाजन केले जाईल.
अनधिकृत स्टॉल हटवण्याबरोबर अन्य उपाययोजना राबविण्याचा विचार आहे. या उपाययोजना राबविताना संबंधित घटकांशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील.



