Education Department: शालेय शिक्षण विभागात साफसफाई! एकाच दिवसात ६९ बड्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी
Education Department: शिक्षण आयुक्त कार्यालय, माध्यमिक, प्राथमिक आणि योजना संचालनालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे मंत्रालयात चर्चांना उधाण.

Education Department – शालेय शिक्षण विभागात एकाच पदावर वर्षानुवर्ष तळ ठोकलेल्या तब्बल ६९ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. शिक्षण आयुक्त, माध्यमिक व उच्च शिक्षण संचालनालय, प्राथमिक शिक्षण संचालनालय, योजना शिक्षण संचालनालय, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिक्षणाधिकारी कार्यालय आदीसंह अन्य कार्यालयातील बहुसंख्य अधिकाऱ्यांचा तीन वर्षाहुन अधिक काळ पूर्ण झाला होता. यामुळे काही अधिकाऱ्यांची मक्तेदारीही झाली होती. या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणासाठी बदल्या केल्या आहेत. पशिक्षणाधिकारी १५, अधीक्षक ५, अधिव्याख्याता २३, शिक्षणाधिकारी ११,
वरिष्ठ अधिव्याख्याता १५ यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांना सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश आहेत. नवे अधिकारी मुदतीत रुजू होतील, याची खातरजमा करून तसा अहवाल शासनास सादर करावा लागणार आहे. बदली टाळण्याची कृती गैरवर्तणूक समजून कारवाई करण्याचा इशाराही शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. आता प्रशासकीय बदल्यानंतर विंनती बदल्यासाठी कधी मुहुर्त सापडणार याची उत्सुकता अधिकाऱ्यांमध्ये आहे.





