अग्रलेख : बेभरवशाचेच राजकारण
महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Politics) सध्या लागलेले वाकडे वळण निव्वळ सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव आहे, हे आता रोजच्या घडामोडींवरून सिद्ध होत चालले आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Politics) सध्या लागलेले वाकडे वळण निव्वळ सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव आहे, हे आता रोजच्या घडामोडींवरून सिद्ध होत चालले आहे.
गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीत जे काही नाट्य रंगले, ते पाहिल्यावर सामान्य माणसाला प्रश्न पडतोय की, ही प्रगल्भ आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी 8 जुलै 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील केबिनमध्ये जाऊन त्यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर मविआमध्ये उडालेला भडका, हा महाराष्ट्राच्या बदलत्या आणि कदाचित अगोदरच घसरत चाललेल्या राजकीय मूल्यांना अधिक खोलात घेऊन जाणारा प्रकार आहे.
या भेटीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी घेतलेला आक्षेप आणि त्याला राष्ट्रवादीच्या गोटातून मिळालेले ताबडतोड उत्तर, हा केवळ दोन पक्ष अथवा त्यांच्या प्रवक्त्यांमधील कलगीतुरा नाही, तर तो दोन भिन्न राजकीय विचारसरणींमधील आपलेपण संपल्याचे लक्षण आहे. संजय राऊत यांनी या भेटीला गद्दारांचे उदात्तीकरण असे संबोधले.
ज्या एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले, शिवसेना फोडली, त्यांच्याच छताखाली जाऊन शरद पवारांनी बैठक घ्यावी, हे शिवसैनिकांच्या आणि मविआच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पचनी पडणारे नाहीच ही (Maharashtra Politics) वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा संताप वाजवी वाटतो, कारण राजकारणात लाख कुरघोड्या आणि उचापती होत असल्या तरी जेव्हा एक समान विचार आणि कार्यक्रम घेऊन एकत्र येता तेव्हा त्यासोबत काही पथ्ये आणि आचारसंहिताही येत असते व ती पाळावी लागतात.
तसे न होता आणि नैतिकतेचे सगळे निकष बाजूला सारून केवळ सोयीची मैत्री केली जाते, तेव्हा निष्ठावंतांना ते रूचत नाही आणि त्यांच्या मनात संशयाचे वारे शिरते. पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे ते झाले नसते तरच नवल होते. संजय राऊत यांनी त्यांच्या रोज सकाळच्या शिरस्त्यानुसार या भेटीवर आगपाखड केली. त्याला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी तेवढ्याच जोरात उत्तरही दिले.
प्रकरण अगदीच हाताबाहेर चालले असल्याची जाणीव झाल्यावर स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तोही विचार करण्यासारखा आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चांगले किंवा वाईट आपली चर्चा होतेय, याचा अर्थ आपले नाणे अजून खणखणीत आहे. काही विधाने बोलायला, ऐकायला आणि वाचायलाही चांगली वाटतात. त्यातलेच हे एक विधान. यामुळे कदाचित पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि शरद पवारांवर प्रेम करणार्या राज्यभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांना नवी उमेद, साहेबांच्या नव्या खेळीबाबत चर्चा करण्यासाठी खाद्य नक्कीच मिळेल.
मात्र त्याचवेळी माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण जेव्हा उघडपणे म्हणतात की राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे, त्यामुळे हा पक्ष फुटण्याची शक्यता ते अप्रत्यक्षपणे वर्तवतात आणि याच सुमारास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील भाजपच्या विनोद तावडेंना पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटल्याच्या बातम्या येतात, तेव्हा नाण्याच्या खणखणाटापेक्षा संशयाची पाल जास्त चुकचुकते! राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, राजकारण हे भावनांवर नाही तर आकड्यांवर चालते.
हाच तर आजच्या राजकारणाचा सर्वात मोठा दोष आहे. सध्या नेत्यांना वाटतेय की राजकारण म्हणजे केवळ संख्याबळ आणि सत्तेचे समीकरण आहे. जर राजकारणातून भावना, निष्ठा आणि नैतिकता वजा केली, तर मग लोकशाहीला काय अर्थ उरतो? केवळ आकडेमोड करायची असेल, तर मग जनतेने कोणावर विश्वास तरी का ठेवावा? आकडेमोड करून सगळेच एकत्र येणार असतील तर सगळेच निरर्थक.
राजकारणात संवाद व्हायला हवा पण; तो संवाद जर स्वतःच्याच मित्रांमध्ये संशय निर्माण करणारा असेल, तर त्या संवादाला राजकीय मुत्सद्दीपणा म्हणायची चूक करण्याचे दिवस किमान आजच्या महाराष्ट्रात तरी निश्चितच नाहीत. एकनाथ शिंदेंच्या मते अशा निखळ भेटी, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण त्यांनी हेही सांगावे की, राजकीय श्रेष्ठत्वासाठी पक्ष फोडणे, हीसुद्धा महाराष्ट्राची संस्कृती आहे का? आणि जर अशा फोडाफोडीच्या (Maharashtra Politics) घटना अगोदर झाल्या असतील तर मग अशा नेत्यांच्या दालनातील बैठकांकडे राजकीय संस्कृती म्हणून कसे काय पाहता येते आणि ते लोकांनी तरी कशाला पाहावे? या संपूर्ण प्रकरणात संजय राऊत यांचा गैरसमज झाला असल्याचे सुप्रिया सुळे म्हणतायत.
पण हा गैरसमज केवळ राऊतांचा नाही, तर महाराष्ट्रातील लाखो मतदारांचा आहे, कारण त्यांनी या फोडाफोडीच्याच विरोधात महाविकास आघाडीला लोकसभेत मतदान केले होते. जर एका साध्या भेटीमुळे मविआची पाया-मुळे हलत असतील, तर आघाडीतील सर्वच पक्षांनी व नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की, ते खरोखरच प्रामाणिकपणे एकत्र उभे आहेत की अजूनही त्यांच्या एका पायाची पावले सत्ताधारी एनडीएकडे वळत आहेत? कोणाच्या राजकारणातील ज्येष्ठतेमुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे दुर्लक्ष करावे अथवा सकारात्मकच अर्थ घेण्याचा काळ आता गेला आहे.
विरोधकांशी सलोख्याचे संबंध जरूर असावेत पण; अकारण आपणच बांधलेली मोट फुटणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे, तरच विरोधी आघाडीचे भविष्य उज्ज्वल असेल. अन्यथा राज्यात किंवा देशात विरोधी पक्षच नसेल, सर्वच सत्ताधार्यांच्या मर्जीतील आणि विरोधी पक्षात किंवा आघाडीत असूनही सत्ताधार्यांसोबत असणारेच राहतील.






