Editorial : महाराष्ट्र साहित्य परिषदेची बहुचर्चित निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक निकाल जाहीर (Editorial) झाला. साहित्य परिषदेसारख्या संस्थांची निवडणूक एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसारखी लढवली गेली आणि त्यात राजकीय शक्तींनीही पुढाकार घेतल्याचा प्रकार यानिमित्ताने पाहायला मिळाला आहे. भाजप परिवाराने पद्धतशीर व्यूहरचना करत ही निवडणूक लढवली आणि साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था आपल्या ताब्यात घेतली, असा सर्वसाधारण प्रतिक्रियेचा सूर आहे. आणि तो खराही आहे. या निवडणुकीत (Editorial) दोन प्रमुख पॅनल रिंगणात होते. त्यातील साहित्य संवर्धन पॅनल हे भाजप समर्थित पॅनल म्हणून ओळखले गेले, तर परिवर्तन उत्कर्ष पॅनल हे या संस्थेतील विद्यमान पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखालचे पॅनल होते. अर्थात, हे विद्यमान पदाधिकार्यांचे पॅनेल कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या प्रभावाखालील पॅनल नव्हते, ते साहित्य क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेले पॅनल समजले गेले. पण त्यांना समर्थित पॅनेलने सुनियोजित आव्हान उभे केले आणि अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत संघ शक्तीचा विजय झाला. साहित्यविषयक संस्थांवर निवडून येणारे प्रतिनिधी वैयक्तिक पातळीवर कुठल्याही राजकीय विचारसरणीशी संबंधित असले तरी त्याबाबत फार आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, अशा साहित्यविषयक संस्थांवर काम करणार्या प्रतिनिधींनी आपले वैयक्तिक राजकीय विचार बाजूला ठेवून निकोप मनाने मराठी साहित्याला बळ देण्याचे काम करावे एवढीच अपेक्षा असते. Editorial पण निवडणुकीतील प्रचार काळात जे जे गैरप्रकार झाले किंवा जे गढूळ वातावरण निर्माण झाले त्यातून ही संस्था आता या पुढील काळात एखाद्या विशिष्ट राजकीय विचारसरणीचे बाहुले बनणार नाही ना अशी शंका कोणाच्याही मनात उपस्थित होईल. या निवडणुकीत मतदानातील गैरप्रकार, मतदारांना धमकावणे, मतमोजणीतील गैरप्रकार, पैशाचे प्रलोभन दाखवणे असे सगळे प्रकार घडले आहेत आणि त्याविषयीच्या बातम्या वाचल्यानंतर साहित्यविषयक संस्थेमध्ये असेही घडू शकते याचे वैषम्य वाटल्याखेरीज राहिले नाही. एखादे तरी क्षेत्र असे असावे की ज्यात राजकीय विचारसरणी कटाक्षाने दूर ठेवायला हवी किंबहुना फार मोठा इतिहास असलेली मसापसारखी संस्था कुठल्यातरी राजकीय विचारांची होता कामा नये, अशी अपेक्षाही चुकीची ठरत नाही. पण या बाबींचा कोणताच मुलाहिजा न ठेवता केवळ आपल्या विचारसरणीच्या ताब्यात ही महत्त्वाची संस्था असली पाहिजे अशा इराद्यानेच काही मंडळी या निवडणुकीत उतरली होती. या निवडणुकीसाठी एकूण 16,607 मतदार मतदान करण्यास पात्र होते त्यापैकी 10 हजार 901 जणांनी मतदान केले आणि इतके मोठे मतदान होऊनही तीन महत्त्वाच्या जागांचा जो निकाल लागला त्यातील प्रतिस्पर्धी उमेदवारांमधील मतांचे अंतर केवळ सुमारे 45 ते 350 इतकेच होते. यावरून ही निवडणूक किती चुरशीची झाली याचा अंदाज येतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेत अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष ही तीन पदे महत्त्वाची आहेत आणि या तीनही पदांवर साहित्य संवर्धन समितीचे उमेदवार निवडून आले आहेत. अध्यक्षपदी योगेश सोमण विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा पराभव केला पण त्यांच्या मतातील फरक केवळ 45 इतकाच होता. इतक्या कमी फरकामुळे पराभूत पॅनलने मतमोजणी प्रक्रियेविषयी शंका व्यक्त करीत फेर मतमोजणीची मागणी केली पण ती मागणी मान्य झाली नाही. निवडणूक निर्णय अधिकार्याचे म्हणणे असे होते की आमच्याकडे फेरमतमोजणीची अधिकृत मागणीच आली नाही. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे जे दावे केले गेले त्यापैकी एका दाव्यात असे म्हटले आहे की परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या उमेदवारांनी 6200 एक गठ्ठा मतपत्रिका परिषदेत जमा केल्या. त्यामुळे आमच्या उमेदवारांना किमान 6200 मते मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष मतमोजणीत तेवढी मते दिसली नाहीत, मग आमची बाकीची मते कोठे गेली असा त्यांचा सवाल आहे आणि त्यांनी तसे अधिकृत पत्र निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिले आहे. परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या स्थानिक कार्यवाहक क्रमांक तीनच्या उमेदवार मृणालिनी कानिटकर यांनी म्हटले आहे की मतमोजणी सुरू असताना मी स्वतः माझी स्वतःची मते मोजली त्यावेळी ती 815 इतकी असल्याचे मला आढळून आले पण प्रत्यक्ष जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा माझ्या नावावर केवळ 777 मतेच दाखवली गेली आहेत, हा तब्बल 38 मतांचा फरक असून ही मते कोठे गेली असा सवाल त्यांनीही केला आहे. मतमोजणीतील गैरप्रकाराचे हे जे आरोप आहेत त्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. बाकी संस्थांच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेत गैरव्यवहार होण्याचे प्रकार अगदी सर्रास घडत असले तरी येथे साहित्य संस्थेच्या निवडणुकीत असे घडणे भूषणावह नाही. निवडणूक प्रचार काळातही अनेक आरोप झाले आणि त्याचे पडसाद प्रसारमाध्यमांमध्ये उमटले. आपल्या विचारसरणीच्या पॅनलला विजयी करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे वजनदार नेते प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे काम करत होते, असाही आरोप यानिमित्ताने झाला आहे. हा सगळा प्रकार लक्षात घेतल्यानंतर ठरवून एखादी संस्था ताब्यात घेण्यासाठी ही सगळी व्यूहरचना केली गेली असा आरोप कोणी करेल, पण आता हे आरोप-प्रत्यारोप आणखी काही काळ चालतच राहतील. निवडणुकीचे कवित्व म्हणून (Editorial) आपण ते दुर्लक्षितही करू, पण हेच हेवेदावे या साहित्य संस्थेचा कारभार चालवताना या पुढील पाच वर्षांच्या काळात कायम राहता कामा नयेत. महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य क्षेत्रात अनेकविध उपक्रम राबवणारी अत्यंत नामवंत संस्था आहे. पक्षीय राजकारणातून या संस्थेचा लौकिक लयाला जाता कामा नये हीच अपेक्षा.