विविधा | त्र्यंबक शंकर शेजवलकर

– माधव विद्वांस
मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक व इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी येथे 25 मे 1895 रोजी झाला. वर्ष 1911 मध्ये मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते मॅट्रिक झाले व विल्सन महाविद्यालयातून वर्ष 1917 मध्ये बी.ए. झाले. पुढे मुंबईत लष्कराच्या लेखा विभागात रुजू झाले. हा विभाग पुण्यात हलविण्यात आल्याने शेजवलकर पुण्यास आले आणि 20 जून 1921 पर्यंत ते या नोकरीत राहिले.
पुण्यातील वास्तव्यात ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले. येथे त्यांचा दत्तो वामन पोतदार, दत्तोपंत आपटे, गो. स. सरदेसाई प्रभृतींशी परिचय झाला. यावेळी गो. स. सरदेसाई यांनी त्यांना बडोद्यास आपल्या मदतीसाठी येण्याचे आवाहन केले व त्यानुसार ते बडोद्यास गेले. बडोद्याच्या वास्तव्यात शेजवलकरांच्या गुणवत्तेमुळे रियासतकार सरदेसाई प्रभावित झाले होते. त्यामुळे जेव्हा सरदेसाई यांनी “नानासाहेब पेशवे’ हे पुस्तक लिहिले, त्याची प्रस्तावना लिहिण्याची शेजवलकरांना त्यांनी विनंती केली. या पुस्तकास त्यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली.
तेव्हापासून एक साक्षेपी इतिहासकार म्हणून शेजवलकरांचा नावलौकिक झाला.
कर्नाटक छापखान्याने (मुंबई) काढलेल्या “प्रगति’ ह्या साप्ताहिकाचे संपादन त्यांनी केले आणि त्याद्वारे अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले; पण ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे ते साप्ताहिक बंद पडले. त्यानंतरचा त्यांचा पाच-सहा वर्षांचा काळ हलाखीत गेला. कालांतराने वर्ष 1939 मध्ये मराठ्यांच्या इतिहासाचे प्रपाठक म्हणून त्यांची डेक्कन कॉलेज (पुणे) येथे नियुक्ती झाली. तिथून ते 1955 मध्ये निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून ते डेक्कन कॉलेजात काम करीत.
शेजवलकरांचे एक मित्र ह. वि. मोटे यांनी प्रगति साप्ताहिकात व इतरत्र प्रसिद्घ झालेले काही स्फूटलेख प्रकाशित केले. यामध्ये शेजवलकरांचे लेख : प्रथम खंड (1940) व शेजवलकरांचे लेख : खंड 2 रा (1959) यांचा समावेश आहे. शेजवलकरांनी इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांत पुढील मोजकीच पुस्तके लिहिली- दत्तोपंत आपटे : व्यक्तिदर्शन (1945), पानिपत : 1761 (इंग्रजी-1946), निजाम-पेशवे संबंध (1959), पानिपत : 1761 (मराठी-1961) इत्यादी. याशिवाय त्यांनी काही ऐतिहासिक मूळ पत्रे संपादन करून नागपूर अफेअर्स भाग 1 व 2 (1954 व 1959) या शीर्षकाने प्रसिद्घ केली.
त्यांच्याकडे शिवचरित्र लिहिण्याचे काम मुंबईच्या मराठा मंदिर या संस्थेने सोपविले होते. अखेरपर्यंत ते या कामात व्यग्र होते परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे शिवचरित्र पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेने त्यांनी लिहून ठेवलेली संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, टिपणे, चरित्राचा आराखडा, ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, कौटुंबिक माहिती इ. साहित्य श्री शिवछत्रपति : संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने या शीर्षकाखाली प्रसिद्घ केले (1964). या ग्रंथासाठी शेजवलकरांना साहित्य अकादमी पुरस्काराचा (मरणोत्तर) बहुमान मिळाला. 28 नोव्हेंबर, 1963 रोजी त्यांचे निधन झाले.





