61 वर्षांपूर्वी प्रभात : कन्नडिगांना सोलापूर हवे

कन्नडिगांना सोलापूर हवे
हुबळी, ता. 19 – सोलापूर जिल्ह्यातील दुधनी येथे कर्नाटक कृतिसमितीची (अक्कलकोट) बैठक भरून अक्कलकोट, दक्षिण सोलापूरचे तालुके-सोलापूर शहरासह व उमरगा तालुका (उस्मानाबाद जि.) म्हैसूरमध्ये विलीन करण्याची मागणी करण्यात आली. कर्नाटक कृतिसमितीने, हे तालुके कानडी भाषिकच आहेत; तेव्हा म्हैसूरमध्ये ते सामील न केल्यास कानडी लोकांवर फार अन्याय होईल असा दावा मांडला आहे.
अक्कलकोट महाराष्ट्रात राहिले पाहिजे,अक्कलकोट नागरिकांची मागणी
अक्कलकोट – अक्कलकोट नगरपालिकेच्या अध्यक्ष पार्वतीबाई देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येऊन अक्कलकोट तालुका म्हैसूरमध्ये घालण्याचे योजनेसंबंधी काळजी व्यक्त करण्यात आली. सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिकदृष्टीने अक्कलकोट महाराष्ट्राचा भाग आहे. सोलापूरशी त्याचे संबंध आहे. सोलापूर महाराष्ट्रात राहणार आहे तेव्हा अक्कलकोटही राहावे.
अणुअस्त्र बंदी, रशियाची योजना
जिनेव्हा – भूमिगत चाचणीसह विशिष्ट प्रमाणाहून मोठे असे सर्व अणुस्फोट बंद करण्याचा करार करावा, असे रशियाने आज सुचविले. तसेच कमी किरणोत्सर्जन करणारे अणुस्फोट करणार नाही याला मान्यता दिली तर ब्रिटन व अमेरिकन यांच्या अणुसंशोधन क्षेत्रात (म्हणजे छोटे भूमिगत स्फोट शोधून काढण्याच्या प्रयोगात) सहभागी होण्यास आपण कबूल आहोत असे रशियाने सुचविले आहे. ही अत्यंत महत्त्वाची तडजोडीची योजना आहे.
पांढरे दोन आणे व अर्धा आणा बंद होणार
मुंबई – पांढऱ्या रंगाची निकेलची दोन आणे व अर्धा आणा ही नाणी 1 ऑक्टोबर 1960 पासून बंद होतील. परंतु 1 एप्रिल 1961 पर्यंत रिझर्व्ह बॅंकेच्या कचेऱ्या, सरकारी खजिना कचेऱ्या, दुय्यम खजिना कचेऱ्या, रेल्वे, पोस्ट व तारकचेऱ्या येथे ती स्वीकारली जातील.





