विशेष : वि. दा. सावरकर

-विलास पंढरी
आज दिनांक 26 फेब्रुवारी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन. वयाच्या 82व्या वर्षी औषध-पाणी बंद करीत सावरकरांनी या जगाचा निरोप घेतला तो दिवस होता 26 फेब्रुवारी, 1966. यामुळेच त्यांची पुण्यतिथी “आत्मसमर्पण दिन’ म्हणून साजरी करणे अधिक उचित ठरेल. सावरकरांचे सारे कुटुंबच देशभक्त होते आणि ब्रिटिश शासनकाळात प्रचंड त्रास त्यांना भोगावा लागला. सावरकरांनी आपले सारे आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले.
आक्रमक, साहसी वृत्ती, सर्जनशील व्यक्तिमत्त्व लाभलेले सावरकर इतिहास आणि धर्मशास्त्रावरील पुस्तके वाचत असत. सावरकरांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. इतिहास वाचताना सावरकरांच्या मनात राष्ट्रवाद आकार घेत होता. उन्मत्त आणि जुलमी ब्रिटिश सत्तेशी झगडणाऱ्या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त सावरकरांना अस्वस्थ करू लागले. त्याच काळात रॅंडचा वध करून फासावर चढलेल्या चापेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकरांवर फार मोठा आघात झाला. ते अस्वस्थ झाले.
सावरकरांची बोटीतून मारलेली, मार्सेलिसची उडी ही धैर्याने ओतप्रोत भरलेली होती. सावरकरांनी इंग्रजी भाषेची सरमिसळ झालेली तत्कालीन मराठी भाषा शुद्ध करण्यासाठी पर्यायी मराठी शब्द दिलेत. सावरकरांची राष्ट्रभक्ती, अध्यात्माचा अभ्यास आणि राष्ट्रचेतनेचा ध्यास या रचनेतून अधोरेखित होतो-
जय देव जय देव जय जय शिवराया
या या अनन्य शरणा आर्यां ताराया
या शब्दांतच प्रत्येक घरात शिवरायांची स्फूर्ती पोहोचून त्यांच्या पराक्रमानेच ही भूमी स्वातंत्र्य प्राप्त करून सुराज्याकडे वाटचाल करेल तसेच शिवाप्रभूंचे स्मरण हेच या देशाचे तारणहार आहे अशी आशा सावरकर या आरतीच्या पहिल्याच कडव्यात व्यक्त करतात. आरती अतिशय सुंदर असून खरे तर इतर देवांच्या आरतीप्रमाणे घरोघरी गायली जायला हवी. सर्व भारतीयांना एकत्र येण्यासाठी हिंदू कुणाला म्हणावे याची व्यवस्थित व्याख्या सावरकरांनी केली.
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ।।
याचा अर्थ, भारत ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. पितृभू म्हणजे पितर किंवा वाड-वडिलांची भूमी, यात आई-वडील, आजी-आजोबा या सगळ्या पितरांचा समावेश होतो. म्हणून मातृभू ऐवजी पितृभू शब्द वापरला आहे. सनातन धर्मातील जातीभेद, शिवाशीव यामुळे धर्माचे अतोनात नुकसान होत आहे हे त्यांनी ओळखले आणि समाजासमोर आपले विचार मांडले. उच्च-नीच या भेदामुळे समाज दुरावतो हे त्यांनी पटवून दिले. सावरकरांच्या विचारातील थोडाजरी आचार समाजाने अंमलात आणला तरी त्यांचे स्मरण कारणी लागेल.





