Vinayak Damodar Savarkar : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Vinayak Damodar Savarkar) पुण्यतिथी आहे. त्यांना भारतरत्न द्यावा यासाठी ठराव करावा आणि तो एकमताने संमत करण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत केली आहे. स्वातंत्रवीर सावरकरांना (Vinayak Damodar Savarkar) मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा. संसदीय कार्यमंत्र्यांनी असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा असेही लाड यांनी म्हटले आहे. यावरती, संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. आम्ही हा ठराव सभापती महोदयांकडे मांडू आणि त्यांनतर आपण निर्णय घ्यावा. शासनाने हा प्रस्ताव आणावा लागणार आहे. मी या परिषदेत असा प्रस्ताव आणतो पण तो सभागृहातही आणावा लागेल. त्यानंतर सभापती महोदय आपण निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी सातत्याने केली जाते. विशेष म्हणजे देशात गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून भाजप सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्त्ववादी विचारांवर चालणारे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. मात्र, अद्यापही विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे विविध संघटनांकडून ही मागणी केली जाते. दरम्यान, आरएसएसच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्न पुरस्कारावरुन भाष्य केले होते. शिफारशीची आवश्यकता नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नसल्याचा खुलासा यापूर्वी केंद्र सरकारने केला आहे. अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हा महत्त्वाचा खुलासा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 2019 मध्येच केला होता. भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता नाही. शिफारशी शिवाय देखील हा पुरस्कार दिला जातो. भारतरत्न देण्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.