राहुल गांधींना पुणे कोर्टातून जामीन मंजुर; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहिले हजर

पुणे – स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी येथील विशेष न्यायालयात शुक्रवारी (दि. १०) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. जवळपास १५ ते २० मिनिटे ते ऑनलाईन होते. या कालावधीत त्यांना न्यायालयाने प्रश्नही विचारले. दरम्यान राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजुर केला.
कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी या प्रकरणात जामिनदार आहेत. लोकप्रतिनिधी विरोधातील दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या दाव्याची पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांना हजर राहण्यासाठी १० जानेवारीची तारीख देण्यात आली होती. मात्र, ते प्रत्यक्ष हजर राहिले नाहीत. मात्र, त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी त्यांना व्हिसीद्वारे हजर राहण्यास परवानगी देण्याची मागणी न्यायालयात अर्जाद्वारे केली. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.
त्यांची मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष हजर राहिल्यास यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. उच्च, सर्वौच्च न्यायालयाचे व्हिसीद्वारे काम करण्याचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑनलाईन हजर राहण्यास परवानगी देण्याची मागणी केली. तो अर्ज न्यायालयाने मंजुर केला. त्यानंतर न्यायालयाने गांधी यांना लिंक पाठवली. त्यावर स्वत: गांधी हजर झाले. त्यानंतर प्रक्रीया झाली. २५ हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने त्यांना मंजुर केला. तसेच, केसचा निकाल लागेपर्यंत राहुल स्वत: हजर राहणार नाहीत. तर त्यांचे वकील मिलिंद पवार हजर राहतील, असा अर्ज अॅड. पवार यांनी न्यायालयात केला. तो ही अर्जही मंजुर केल्याचे अॅड. पवार यांनी सांगितले.





