Satara | गाण्यातून उलगडले सावरकरांचे तेजस्वी जीवन

सातारा, (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तेजस्वी जीवनचरित्र गाण्यांच्या माध्यमातून उलगडून दाखवले. अखिल ब्राह्मण महासंघाने येथील शाहू कलामंदिरात आयोजित केलेल्या ‘सागरा प्राण तळमळला‘ कार्यक्रमात चारुदत्त आफळे यांनी सातारकरांना सावरकरांचे जीवनदर्शन नव्याने घडवले. सावरकर यांच्या जयोस्तुते या भारतमातेच्या प्रार्थनेने चारुदत्त आफळे यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
चारुदत्त आफळे आणि त्यांच्या गायक सहकाऱ्यांनी सागरा प्राण तळमळला, अनादी मी अनंत, शतजन्म शोधताना, खेळ मांडियेला वाळवंटी काठी अशी अनेक गाणी सादर केली. चारुदत्त आफळे यांनी आपल्या ओघवत्या वाणीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचेही दर्शन घडवले. संपूर्ण सावरकर कुटुंबाला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा सावरकरांची उपेक्षा झाली, असे त्यांनी सांगितले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. ब्राह्मण महासंघाचा उपक्रम स्तुत्य असून यानिमित्ताने नव्या पिढीला सावरकरांच्या जीवनाचे दर्शन झाले, असे त्यांनी सांगितले. महासंघातर्फे यावेळी चारुदत्त आफळे यांच्या हस्ते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
चारूदत्त आफळे, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीराम देव, सचिव भास्कर मेहेंदळे, खजिनदार महेश कुलकर्णी आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करुन कार्यक्रम सुरु झाला. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी रास्ताविक केले. अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. महेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन सचिन शेवडे यांनी केले. श्रीराम देव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी आणि इतर संचालक सायली मुतालिक, मुकुंद फडके, राजदीप माजगावकर, शलाका शेवडे, प्रशांत इनामदार, श्रीकांत वेलणकर, शशिकांत पंडित, नितीन जोशी, रेखा बंड आदींनी परिश्रम घेतले.
अर्थासह गाण्याचे सादरीकरण
एक कवी म्हणून सावरकर किती श्रेष्ठ होते हे सांगताना चारुदत्त आफळे यांनी सागरा प्राण तळमळला या गाण्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगून रसिकांच्या हृदयापर्यंत अन्वयार्थ पोहोचवला. त्याने रसिकवर्ग भारा७०वून गेला. चारुदत्त यांचे पिताश्री कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांनी सावरकरांवर लिहिलेल्या अनोख्या गीताचे सादरीकरण सुद्धा यावेळी चारुदत्त आफळे यांनी केले.





