अबाऊट टर्न : डायन की सावित्री?

अंधविश्वासाची आणि भलत्यासलत्या भाकडकथांची पाळंमुळं आपल्या समाजात किती खोलवर रुजून बसली आहेत आणि अशा मंडळींना एखाद्या वेळी काळ कसं सणसणीत प्रत्युत्तर देतो, हे दाखवून देणारी एक कहाणी नुकतीच समोर आलीये. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे.
तिथं एक “डायन’ म्हणजे चेटकीण राहत असे. ती आजही आहे; पण आता तिचे “ग्रह’ बदललेत. जेव्हा तिच्या पतीचं कर्करोगानं निधन झालं, तेव्हा लोक म्हणाले बायकोने नवऱ्याला “खाल्लं’! कर्जाच्या ओझ्यानं दबलेल्या आईवर तीन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. थोरला आणि धाकटा मुलगा. मुलगी मधली. ती खूपच तेजतर्रार! लहानपणापासून तिला क्रिकेट खेळायचं वेड. शेती असली, तरी दरवर्षी शेत पुराच्या पाण्याखाली जायचं. पीक नष्ट व्हायचं. कुटुंब झोपडीत राहणारं; पण पोरगी क्रिकेट चांगलं खेळतीये, हे बघून आईनं मुलीला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. भाऊसुद्धा बहिणीला खूप मदत करायचे. ती खेळायला निघाली की बॅट-बॉल काढून द्यायचे.
एके दिवशी धाकटा भाऊ बॉल बाहेर काढत असताना त्याला नाग चावला आणि तोही सोडून गेला. लोक म्हणाले, आईने मुलाला “खाल्लं’! ही बाई घरातल्या एकेकाला “खात’ सुटली आहे, आपल्यालाही तिच्यापासून धोका होऊ शकतो, या (अ)विचारानं पछाडलेले लोक तिला पाहून रस्ता बदलायचे. पण “डायन’ सगळ्यांचं बोलणं मुकाट्यानं सहन करत राहिली.
मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचं “धाडस’ तिने केलं आणि लोक या “डायन’वर आणखीच चिडले. कुणी म्हणालं, तिने मुलीला दलालाला विकलं. कुणी म्हणालं, चुकीच्या मार्गावर नेऊन सोडलं. “डायन’ लोकांच्या नजरेतून खूपच उतरली. दरम्यान, बोर्डिंग स्कूलमध्ये राहून मुलगी क्रिकेटचा कसून सराव करत राहिली आणि गावी तिची आई लोकांचे टोमणे, शिव्याशाप झेलत राहिली. थोरल्या मुलाच्या आधारानं दिवस ढकलत राहिली. चार दिवसांपूर्वी मात्र ही “डायन’ अचानक लोकप्रिय झाली. तिच्या छोट्याशा घरात पाहुण्यारावळ्यांची गर्दी झाली.
सगळे लोक टीव्हीपुढे बसून मॅच बघत राहिले आणि “डायन’ या वीस-पंचवीस पाहुण्यांसाठी चुलीवर स्वयंपाक करत राहिली. तिची मुलगी अर्चनादेवी आपल्या ऑफस्पिनने इंग्लंडच्या खेळाडूंना जेरीस आणत होती. एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिने केवळ 17 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. शिवाय, कव्हर्समध्ये फिल्डिंग करताना तिने एक अवघड झेल टिपला.
हे सगळं बघून पाहुणे तिच्या आईला म्हणाले, तुझं “नशीब’ फिरलं! म्हणजे, आंधळेपणानं जिला दूर लोटलं, तिला जवळ करतानासुद्धा चूक कबूल केलीच नाही… नशिबाच्या गोष्टी करून पुन्हा आंधळेपणाच दाखवला. चक्क एकविसाव्या शतकातली ही परिस्थिती..!
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/archana-devi-dismissed-england-grace-cravens-and-niamh-holland-in-the-final-match/
पाहुणेमंडळी अकलेचे तारे तोडत असताना सावित्री नावाची ती “डायन’ मात्र वेगळ्याच विश्वात होती. आता इतके लोक घरी आले होते, की गर्दी झाली होती. बसायला बस्करं अपुरी पडत होती. समाजापासून तुटल्यामुळं होणाऱ्या वेदना वर्षानुवर्षं सहन करूनसुद्धा “आता का आलात,’ असं तिने कुणाला विचारलं नाही. नाग चावल्यावर धाकटा मुलगा मरता-मरता म्हणाला होता, “अर्चनाला क्रिकेट खेळू द्या.’ हे आठवलं असेल का “डायन’ला? की चुलीच्या धुरामुळं ओलावले असतील डोळे “सावित्री’चे?





