शिवार : ‘स्मार्ट फार्मिंग’ काळाची गरज

अनेक आव्हानांचा सामना शेती क्षेत्राला करावा लागणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आता हायटेक स्मार्ट फार्मिंगच्या दिशेने वाटचाल करायला हवी.
भारताला आपण कृषिप्रधान देश मानत असलो, तरी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) कृषी क्षेत्राचा वाटा एक चतुर्थांशदेखील उरलेला नाही. 2019-20 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, भारताच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा 17.8 टक्के होता. 2020-21 मध्ये हा वाटा वाढून 19.9 टक्के झाला. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना चालविल्या जात असल्या, तरी जगात अन्नधान्याचे संकट ज्या प्रकारे वाढत चालले आहे, ते पाहता संपूर्ण जगभरात स्मार्ट फार्मिंगला प्राधान्य दिले नाही, तर एका मोठ्या लोकसंख्येसमोर उपासमारीची समस्या उभी राहू शकते.
गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या लढाईमुळे अन्नधान्य उपलब्धतेची समस्या निर्माण झाली आहे. कारण, या दोन देशांची मिळून गव्हाच्या जागतिक बाजारपेठेत 25 टक्के हिस्सेदारी आहे. वाढती लोकसंख्या, बिघडत चाललेले पर्यावरण आणि जागतिक तापमानवाढ यामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक समस्या आणि संकटे उभी राहिली आहेत. या सर्व समस्या पाहून भारतासारख्या देशाने जर युद्धपातळीवर शेती स्मार्ट-हायटेक बनविण्यासाठी हालचाली केल्या नाहीत, तर आपण सोनेरी भविष्यकाळ तर गमावून बसूच; शिवाय अन्नधान्याच्या संकटाच्या चक्रव्यूहात आपण सापडण्याचीही शक्यता आहे.
हायटेक स्मार्ट फार्मिंगचा अर्थ असा आहे, की शेतीची अत्यंत चोख आणि फायदेशीर व्यवस्थापन प्रणाली. आतापर्यंत सामान्यतः असे घडत आले आहे, की शेती करण्यापूर्वी शेतकरी याबाबत प्रशिक्षण घेत नाहीत. कुटुंबातून मिळणाऱ्या पारंपरिक ज्ञानावर आधारित तो शेती करतो. परंतु आजच्या काळात अशा प्रकारची शेती करण्याचा अर्थ शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाला अभावग्रस्त बनविणे; शिवाय या देशाचेही नुकसान करणे, असा आहे. कारण, देशात आवश्यकतेइतकेही अन्नधान्याचे उत्पादन होऊ शकत नाही. विशेषतः भविष्यातील गरजांचा वेध घेतला असता सध्याचे उत्पादन खूपच कमी आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगभरात शेती हायटेक-स्मार्ट बनविण्याची प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. भारत सरकारही या दिशेने वेगाने प्रयत्न करीत आहे.
स्मार्ट फार्मिंग संकल्पनेअंतर्गत शेती ही अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली जाते. या अंतर्गत इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा कलेक्शन, डेटा ऍनालिसिस आदी तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. यात अन्नधान्याचे ट्रॅकिंग, प्रोटेक्शन आणि संचालन यांचे विश्लेषण केले जाते. यात ज्या तंत्रज्ञानाचा विशेषत्वाने वापर केला जातो, त्यात सेन्सर, नेटवर्किंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), डेटा कलेक्शन आदींचा समावेश आहे. सेन्सरच्या माध्यमातून पाणी, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि तापमानाचे अध्ययन आणि वेगवेगळ्या पिकांसाठी त्यांचा चपखल वापर कसा करावा, हे समजते. त्याचप्रमाणे नेटवर्किंग आणि जीपीएसचा वापर कृषी उत्पादनाचे वितरण आणि चांगला भाव मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो.
इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानांतर्गत शेतीची सर्व कामे स्वयंचलित आणि यंत्रमानवचलित केली जातात. म्हणजेच कृषी क्षेत्रात ज्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जातो, त्याचे संचालन आयओटी तंत्रज्ञान करते. याअंतर्गत पिकाला कधी खतांची गरज आहे, कधी कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे, हे आयओटी स्वतःच निश्चित करते. पिकाचे अपेक्षित उत्पादन, माती, जलवायू परिवर्तन, हवामानाची आकडेवारी, यंत्रसामग्री आणि पशुस्वास्थ्याशी संबंधित आकडेवारीचा संग्रहसुद्धा केला जातो.
स्मार्ट कृषीची सर्व तंत्रे आधुनिक शेतीच्या अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आहेत, ज्यामुळे शेतीत संसाधनांचे प्रमाण तर वाढताना दिसते; परंतु उत्पादन आणि गुणवत्तेत घसरण होत आहे. अलीकडील काळात असेही दिसून आले आहे की, अत्याधिक प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मातीची प्रत कमी होत आहे. मातीतील पोषक घटक कमी होत आहेत. जमिनीच्या पोटातून जास्तीत जास्त पाण्याचा उपसा केल्यामुळे भूजलपातळी अधिकाधिक घसरत चालली आहे. तसेच सातत्याने कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव संपुष्टात आला आहे. शेतात तणनाशकांचा वापरही वाढत चालला असून, त्यामुळेही समस्या निर्माण झाल्या आहेत. कदाचित यामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न सातत्याने घसरत चालले आहे. मातीत क्षारांचे प्रमाण वाढत असून, शेतातून येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्येही विषारी घटक आढळून येत आहेत. या सर्व समस्या पाहता, शक्य तितक्या लवकर शेतीचे रूपांतर स्मार्ट फार्मिंगमध्ये करावे लागेल.
संयुक्त राष्ट्रांच्या वैश्विक सातत्यपूर्ण विकास उद्दिष्टांच्या संमेलनात मांडल्या गेलेल्या अजेंड्यावर भारतानेही अन्य देशांच्या बरोबर स्वाक्षरी केली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या अंतर्गत विकासाची 17 उद्दिष्टे पुढील आठ वर्षांत गाठावी लागणार आहेत. त्यात अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा, उपजीविकेची सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, जैवविविधता संरक्षण आणि मृद संरक्षण यांचा अंतर्भाव आहे. या सर्व मुद्द्यांवर नजर टाकली असता असे दिसून येते, की जगाचे लक्ष कृषी क्षेत्राकडेच लागून आहे. कारण, जगाचे भविष्यच कृषीवर अवलंबून आहे. अर्थात, ही शेती पारंपरिक नसून स्मार्ट फार्मिंग असल्यास हे उद्दिष्ट गाठता येईल.





