WEF: दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, रुरल एन्हान्सर्स ग्रुप आणि न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया यांच्यात सुमारे 2,500 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात आधुनिक, हवामान-संवेदनशील आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीला चालना मिळणार आहे. रूरल एन्हान्सर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयदे आणि ’न्यूट्रीफ्रेश’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत मेहता यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव एन. बालागन, ’एमआयडीसी’चेव्यवस्थापकीय सहसंचालक वेलारासू, रुरल एन्हान्सर्सचे प्रधान सल्लागार जयंत येरवडेकर आदी उपस्थित होते. या सामंजस्य कराराअंतर्गत राज्यात हवामानाधारित स्मार्ट आणि तंत्रज्ञानाभिमुख शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार असून, हा प्रकल्प एप्रिल 2026 पासून कार्यान्वित होणार आहे. देशातील आघाडीची कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट ऍग्रीकल्चर (सीईए) कंपनी असलेल्या न्यूट्रीफ्रेशचे तांत्रिक कौशल्य यामध्ये वापरण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षित, सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाचे कृषी उत्पादन देण्यासाठी न्यूट्रीफ्रेश ओळखली जाते.