स्वागत पुस्तकांचे : शिदोरी – “जन्म-जीवन-मृत्यू’चा अनुबंध

“कथा’ या साहित्य प्रकारात अलीकडच्या काळात अनुभवसिद्ध आणि प्रबोधनात्मक कथांचा एक विशेष प्रवाह सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सुनील निकाळजे यांनी लिहिलेल्या “शिदोरी’ या कथासंग्रहाबाबत तर असे आवर्जून म्हणावेसे वाटते.
एलआयसी एजंट म्हणून काम करीत असताना त्यांनी अनेकांचे जीवन अगदी जवळून पाहिले आहे. अनेक व्यक्ती-प्रकृती त्यांनी अनुभवल्या आहेत. त्यातून “माणुसकी’ आणि “चांगुलपणा’चे विशेष धडे त्यांना गिरवायला मिळाले. हेच विशेष गुण त्यांनी “शिदोरी’ या कथासंग्रहात शब्दबद्ध केल्याचे दिसून येत आहे. “शिदोरी’ या कथासंग्रहात एकूण सतरा कथा आहेत. मुळात “शिदोरी’ या शब्दाचा अर्थच असा आहे की, बरोबर काही घेऊन जाणे किंवा मागे वारसा म्हणून ठेवून जाणे. एलआयसीमध्ये काम करताना या शब्दाचा खरा अर्थ निकाळजे यांना उमगला असल्याचे त्यांच्या कथांमधून दिसून येत आहे.
“दही भात’ आणि “भिकारी’ या त्यांच्या सुरुवातीच्या दोन कथा जीवनाचे खरे वास्तव सांगून जातात. एका कथेमध्ये आजारपण आणि दारिद्य्र एकत्र कधी येऊ नये, हे सांगत असताना आपल्या पालकांची आजारी मुलाबाबत असलेली व्यथा आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी डॉक्टरांकडे असलेली आस्था अशा दोन गोष्टींचा अनुभव येतो. तर “भिकारी’ ही कथा भूतदया शिकवून जाते. भीक मागून आणलेल्या अन्नातूनही पशू-पक्ष्यांचा वाटा वेगळा काढून ठेवणे, हीच मानवता आहे. त्यात समृद्ध जीवन आहे.
जीवनाचे वास्तव सत्य आहे मृत्यू. “मृत्यू- एक शिकवण’ ही कथा आपल्याला नक्कीच सर्व गोष्टींचे अवलोकन करायला लावते. कुठे, कसा, कधी असा “क’च्या अद्याक्षरात वसलेला काळ आपल्याला जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत नेऊन पोहोचवतो. आयुष्य कसे जाणार हे पाहण्यासाठी ज्योतिषाचीही मदत आपण घेतो; पण जीवन आणि मृत्यू या प्रवासात एका श्वासाचे अंतर असते, हेच यावेळी विसरतो. यासाठी भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या संदेशाचे प्रेरक म्हणून दिलेले उदाहरण खूप काही सांगून जाते. अखळ आणि अनिश्चित अशा या जीवनमूल्याचे केलेले विवेचन जगावेगळे नाही; पण सहज सरळ आहे, ही अनुभूती मिळते.
“कमाई! पस्तीस पैसे’, “देवाची चूक’, “आत्महत्या’, “प्रायश्चित्त’, “ग्रेट डॉक्टर – कृतज्ञ पेशंट’ या कथा वाचताना त्यातील कथा सार आणि प्रेरणात्मकता जिवंत करून जाते, हे मात्र नक्की. “शिदोरी’चे मुखपृष्ठ पाहिले की लगेचच लक्षात येते, या पुस्तकात जन्म-जीवन-मृत्यू या त्रिसूत्रीची एक साखळी अनुबंधित केलेली आहे.
प्रकाशन- निशिगंधा प्रकाशन, पुणे
एकूण पृष्ठे – 160
मूल्य – 290 रुपये





