रूपगंध : उंछ वृत्तीची कथा

– ओम
युधिष्ठिराने सर्वात श्रेष्ठ आश्रम आणि त्याचा धर्म (वागणे) कोणता? असा प्रश्न पितामहांना विचारला. त्यावर पितामह म्हणाले- ‘नारद मुनींनी इंद्राला सांगितलेली कथा मी सांगतो.’ गंगेच्या दक्षिण किनार्यावर एका गावात एक सात्विक ब्राह्मण राहात होता. संसार झाल्यावर तो धार्मिक गोष्टींकडे वळला. पण वेदांप्रमाणे, शास्त्रांप्रमाणे की इतर सज्जनांप्रमाणे वर्तन करावे या गोंधळात तो पडला. एकदा त्याच्याकडे एक तपस्वी आला. त्याला त्याने विचारले, ‘माझे आजवरचे आयुष्य संसारात गेले पण मला तर संसार पार होण्याचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे संन्यास घ्यावा म्हटले तर तेही अन्न वस्त्रासाठी दारोदार भटकताना दिसतात. मग मी काय करू?’
तपस्वी म्हणाला – ‘स्वर्गात जाण्याचेही खूप मार्ग आहेत. कोणी यज्ञ करून, कोणी वानप्रस्थाश्रम घेऊन, कोणी गुरू करून, कोणी अहिंसा, सत्यव्रत, राजधर्म तर कोणी फक्त आई-वडिलांची सेवा करून स्वर्गात गेले आहेत. कोणी फक्त दुष्ट वाईट वागले तरी सरळपणे वागून स्वर्गलोकी गेले. मांधाता या राजर्षीने राज्यात दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडून प्रत्यक्ष इंद्रावर मात केली. त्या राज्यात पद्मनाथ नावाचा नाग राहात असे. तो कर्म, उपासना व ज्ञान हे तिन्ही मार्ग वापरून सगळ्यांना काया, वाचा व मन यांनी संतुष्ट ठेवतो. पण कोणी तिरका वागला तर त्याला साम, दाम, दंड, भेद या उपायांनी नीट करतो. तो खूप साधा, सरळ, पवित्र असून तू त्यालाच हे विचार.’
तपस्व्याचा पाहुणचार केल्यानंतर तो ब्राह्मण त्या नागाच्या गावी चौकशी करत करत पोचला. नागाला सन्मानपूर्वक हाका मारल्यावर नागपत्नीने बाहेर येऊन त्याचे स्वागत केले. तिने ‘काय काम आहे?’ असा प्रश्न करता ‘मला नागदर्शनाची इच्छा आहे’ असे उत्तर त्याने दिले. नागपत्नी म्हणाली – ‘गेले महिनाभर ते सूर्याचा रथ ओढण्यासाठी गेले असून सात आठ दिवसात ते निश्चित परत येतील.’ यानंतर तो ब्राह्मण म्हणाला – ‘नाग येताच मला कळवा. तोवर मी गोमतीच्या तीरावर पुळणीत वाट पाहतो. मी दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही.’ त्यानंतर तो ब्राह्मण व्रत करून जप करत पुळणीवर बसून राहिला. नागकुळातील त्याचे नातेवाईक आले, त्यांनी व्रत सोडण्यास सांगितले तरीही त्यांचे न ऐकता ब्राह्मणाने व्रत सुरूच ठेवले.
काही दिवसांनंतर नाग परत येताच नागपत्नीने त्याला ब्राह्मण आल्याची वार्ता सांगितली. नागाला ‘तो कोण असावा’ असा संभ्रम पडला. आपण देव, दैत्य व देवर्षी यांच्यापेक्षा तेजस्वी असून वर देण्याचेही आपले सामर्थ्य असल्याचे तो पत्नीला म्हणाला. तेव्हा पत्नी म्हणाली – ‘दुःखात मनुष्य राजाकडे गेला आणि राजाने त्याचे दुःख दूर केले नाही तर भ्रूणहत्येचे पाप राजाला लागते.’
पत्नीचे ऐकून तो ब्राह्मणाजवळ गेला व येण्याचा हेतू त्याला विचारला. ब्राह्मण म्हणाला – ‘मला गृहवास हा घातक असल्याचे कळूनही माझी त्याबद्दलची आसक्ती मात्र सुटत नाही. त्यामुळे मी ब्रह्मोपासना करू म्हटले तरी चित्त हलते आहे. आता तूच हे कोडे उलगड.’ नाग ब्राह्मणाला सांगू लागला – ‘सूर्यच पृथ्वीचा त्राता आहे. आठ महिने किरणांनी पृथ्वीवरील पाणी घेतो व चार महिने तेच पाऊसकालात परत करतो. पण एक दिवस सूर्याइतकाच किंवा त्याहून तेजस्वी दुसरा सूर्य त्यात मिसळून गेला. तो आता सूर्याप्रमाणे सूर्यासह फिरतो आहे. ते केवळ उंछ वृत्तीने त्याला साधले.’
‘उंछवृत्ती म्हणजे काय?’ ब्राह्मणांने विचारले. सांगतो, नाग म्हणाला, ‘पृथ्वीवर असताना तो फळेमुळे किंवा झाडाची पडलेली पाने किंवा नुसते पाणी व वायू भक्षण करून समाधानी असे. तो शंकरभक्ती करत इतरांच्या हितासाठीही झटत असे. त्यामुळे तो मनुष्य असूनही सिद्धीपासून सिद्धांच्या गतीस गेला.’ हे ऐकून तो ब्राह्मण च्यवण भार्गवाकडे जाऊन त्याने या व्रताची दीक्षा घेतली व तसेच आचरणही केले. सर्व इच्छा सोडून, यमनियम पाळून, तो वनात राहिला आणि शेतातील खळ्यांवरून टिपलेल्या दाण्यांवर उदरनिर्वाह करून नागाने सांगितलेल्या मार्गाने गेला.





