रूपगंध : पोपटाची गोष्ट

– एकनाथ आव्हाड
आठवीच्या वर्गात मुलांचा दंगा सुरू होता. शेवटचा तास होता अवांतर वाचनाचा. पण आज सर रजेवर असल्यामुळे वर्गावर दुसरं कोणीच आलं नाही. मुलांची गडबड ऐकून मुख्याध्यापकच अचानक वर्गात शिरले. तसा सगळा वर्ग एका क्षणात चिडीचूप झाला. सर म्हणाले, ‘काय रे, कसली गडबड चाललीय तुमची?’ वर्गप्रमुख तुषार पटकन उठून उभा राहिला. सरांना म्हणाला,
‘सर त्या खिडकीकडे बघा. पोपट आलाय शाळेत अभ्यासाला.’ सरांनी खिडकीकडे पाहिले तर खरंच की, एक पोपट चक्क खिडकीवर येऊन बसला होता. लालचुटुक चोचीचा, हिरवागार पोपट फारच सुंदर दिसत होता. जोरजोरात तो मिठू मिठू करायला लागला. मिठू मिठू करता करता मध्येच तो खिडकीच्या गजावर बसून झोके घ्यायचा. खिडकीच्या तावदानावर चोचीने तालबद्ध टकटक करायचा. मुलांसाठी जणू त्याचा आता खेळच सुरू झाला. बराच वेळ झाला. पण पोपटाचा मिठू मिठू काही केल्या थांबेना. आणि तो उडूनही जाईना.
तेवढ्यात वर्गातला प्रशांत सरांना म्हणाला, ‘सर, मी या पोपटाला पकडू का? मी त्याला घरी घेऊन जाईन. त्याला पिंजर्यात ठेवीन. त्याला खायला पेरू, मिरची आणि डाळिंबाचे दाणे देईन. त्याला मी पाळेन. त्याचे मी लाड करेन. सर, पोपट म्हणे माणसासारखा बोलतो. त्याला मी बोलायला शिकवेन. मग आम्ही दोघे एकमेकांशी खूप खूप बोलू.’
सर म्हणाले, ‘अरे, पोपटाला पाळणं, त्याला पिंजर्यात ठेवणं म्हणजे त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणं. आपलं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेतलं तर आपल्याला ते चालेल का? नाही ना? प्राणीमात्रांचंसुद्धा तसंच आहे. त्यांना डांबून ठेवलं आणि त्यांच्या आवडीचं त्यांना खायला दिलं तरी त्यांना ते नको आहे. ते जणू म्हणतात,
तुमचा सोन्याचा घास नको, आम्हाला तुमचा त्रास नको
आमचे जग आम्हाला बघू द्या, आनंदात आम्हाला जगू द्या’
तेवढ्यात तो खिडकीवरचा पोपट मिठू मिठूची शीळ घालून उडून गेला एकदाचा. घाटपांडे सर म्हणाले, ‘मुलांनो, मनसोक्त बागडण्यासाठी तो पोपट उडून गेला. पण उडता उडता एक गोष्ट मला तो देऊन गेला.’
‘कोणती गोष्ट सर?’ मुलांनी उत्सुकतेने विचारले.
सर म्हणाले, ‘एका झाडावर पाखरांची, रोज बसायची रांग
पोपटाला म्हणायची, गोष्ट नवीन सांग’
गोष्ट म्हटल्याबरोबर मुलांनी एकच कल्ला केला. ‘सर, एक गोष्ट सांगा ना. तुम्ही कविता, गोष्ट किती छान सांगता.’
सर म्हणाले, ‘अरे आज गोष्ट नाही. पण चला, आज आपण एक खेळ घेऊया. या खेळाचे नाव आहे गुंफूया कवितेच्या ओळी.’
वर्गाला माहीत होतं, सर कवितेतील खूप छान बोलतात. तरी तुषारने विचारले, ‘म्हणजे सर आम्ही नेमकं काय करायचं?’
‘अरे, मी कवितेच्या एका कडव्यातील एक ओळ सांगणार. तुम्ही दुसरी ओळ सांगून कवितेचे कडवं पूर्ण करायचं. पोपट पाखरांना गोष्ट सांगतोय, हाच आजच्या कवितेचा विषय. बघू या, कसं कसं आणि काय काय सुचतंय तुम्हाला? आणि तुम्ही यमक कसे जुळवता तेही कळेल मला. पोपटाची गोष्टच पण ती कवितेतून. चला करूया सुरुवात.’
मुले एका सुरात ‘हो’ म्हणाली.
सर म्हणाले, ‘पोपटाची गोष्ट भारीच असे गोड’
वर्गातील मालती म्हणाली, ‘रसाळ, मजेदार जणू ती पेरूची फोड’
सर म्हणाले, ‘मस्तच! मालतीने सुरुवात तर छानच करून दिलीय. आता पुढची ओळ,
सारं काम आवरून चिऊताई येते.’
वर्गातला धीरज म्हणाला, ‘पोपटाच्या गोष्टीत छान रंगून जाते.’
‘मस्त मस्त. आता पुढे,
कोकीळभाऊ गोष्टीसाठी धावतच येतो.’
राघव म्हणाला, ‘गोष्ट संपल्यावर कुहुकुहू गातो.’
‘अरे वा! भारीच की! आता पुढे,
कबुतरराव गोष्टीसाठी फार उतावीळ’
सरिता म्हणाली, ‘गोष्ट ऐकल्यावर घालतो शीळ’
‘हुशार रे तुम्ही सारेच! आता पुढे,
कावळेदादा पोपटाचे करी गुणगान’
तुषार म्हणाला, ‘पोपटाच्या गोष्टीत म्हणे वेळ जातो छान’
‘किती छान! आता पुढची ओळ,
पोपटाची गोष्ट ही आनंदाचा ठेवा’
रत्नमाला म्हणाली, ‘पाखरं म्हणे गोष्ट जणू रानचाच मेवा’
सर म्हणाले, ‘आता गोष्टीचा शेवट बरं का!
गोष्ट संपल्यावर जादू घडे’
इथे मात्र मुलांना काहीच सूचेना. कारण पोपटाच्या गोष्टीचा हा शेवट होता आणि तो भन्नाटच असला पाहिजे. कुणालाच काही सांगता येईना. मग सरांनीच गोष्टीचा शेवट करायचा ठरवलं. सर म्हणाले,
‘गोष्ट संपल्यावर जादू घडे
पाखरांना घेऊन झाड उंच उडे’
गोष्टीचा शेवट मुलांना खूपच आवडला. गोष्ट ऐकल्यावर झाडंही पाखरांसारखं आनंदाने उडायला लागलं, ही कल्पनाच केवढी भारी! मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली. आता वर्गातल्या पाखरांचा हा थवा दप्तर पाठीला बांधून उंच भरारी घेत आपल्या घरट्यात परतायला सज्ज झाला होता.





