विज्ञानविश्व : एआयचं वर्ष

नव्या वर्षात तंत्रज्ञानाची घोडदौड वेगात सुरू असेल आणि त्यातही आघाडीवर असेल एआय. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे एआय ही संकल्पना नवी नाही, पण गेल्या चार-पाच वर्षांत तिने अनेक नवी क्षेत्रं काबीज केलेली आपण पाहिली आहेत. यावर्षीही एआय अनेक नवी क्षितिजं खुली करेल, असे तंत्रज्ञानाच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे.
गेल्या वर्षाचा शेवट चॅटजीपीटीने गाजवला. यातल्या जीपीटीचा अर्थ आहे जनरेटिव्हप्री-ट्रेन्डट्रान्सफॉर्मर. जनरेटिव्ह एआय दिलेला डेटा वापरून काही नवीन निर्माण करण्याचा (जनरेट करण्याचा) प्रयत्न करतो. कधी तो चॅटवरच्या प्रश्नांना उत्तरं देतो, कधी ब्लॉग किंवा कविता लिहितो, तर कधी अनोखी चित्रं काढतो. त्याला सुरुवातीला काही ट्रेनिंग दिलं की तो त्या दिशेने पुढे शिकत जातो आणि दिलेल्या माहितीचं वेगळ्या प्रकारे परिवर्तन (ट्रान्सफॉर्मेशन) करतो. लेखन, चित्रं, झाल्यावर जनरेटिव्ह एआय येत्या वर्षात व्हिडिओ बनवेल आणि कॅमेरा वापरून केलेल्या खऱ्या दृश्यांच्या व्हिडिओंपेक्षा ते अजिबात वेगळे ओळखू येणार नाहीत. अर्थात या यशाच्या नैतिक बाजूचा कायदेशीर विचार करण्याची वेळ जवळ येणार आहे.
प्रथिन संशोधनातली एआयची उत्तम कामगिरी बघून आता भौतिकशास्त्रातले प्रश्न सोडवण्यासाठी एआयचं सहाय्य घेतलं जात आहे. अणुकेंद्रकातल्या अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास करणाऱ्या पार्टिकलफिजिक्समध्ये तो योगदान देतो. त्याच वेळी अतिभव्य अवकाशाचा वेध घेणाऱ्या ऍस्ट्रोफिजिक्समध्येही त्याची मदत होते. मागच्या वर्षी क्वांटमफिजिक्समधल्या एका गणितात वैज्ञानिकांपुढे एक लाखांहून अधिक समीकरणं सोडवण्याचं आव्हान होतं. एआयने ते चार समीकरणांवर आणून ठेवलं. त्यामुळे या वर्षी एआयच्या मदतीने भौतिकशास्त्रात मोठ्या शोधाची अपेक्षा आहे.
आरोग्यसेवा क्षेत्राला एआय मोठं पाठबळ देऊ शकेल. प्रचंड माहितीचं वेगाने विश्लेषण करायची क्षमता असल्याने रोगाचं निदान करण्यात आणि उपचारांचा मागोवा ठेवण्यात तो माणसापेक्षा सरस ठरतो. करोना महासाथीच्या काळात मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्याची समस्या तातडीने जगापुढे आली. या क्षेत्रात एआयचा खूप फायदा होतो. वैयक्तिक अडचणी समजून घेण्यापासून काही उपयुक्त दिशा देण्यापर्यंत एआयची क्षमता आहे. तिचा योग्य उपयोग करून घेता येईल.
शेवटी पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांसाठी एआयची मदत यापुढे मोलाची ठरणार आहे. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत वणव्यांचा अभ्यास आणि त्यावरचा उपाय यासाठी एआय वापरण्याचा प्रकल्प सुरू आहे. ध्रुवीय प्रदेशातलं बर्फ वेगाने वितळत आहे. त्याचा परिणाम कुठे आणि कसा होईल याचं मॉडेलिंग करताना एआयचा उपयोग होतो आहे. एखादी वस्तू किंवा सेवा पुरवताना एकूण किती कार्बन वातावरणात सोडला जातो याला कार्बन फूटप्रिंट म्हणतात. कार्बन फूटप्रिंटची आकडेमोड अचूक व्हावी आणि त्यानुसार ग्राहकांना योग्य शिफारस व्हावी यासाठी एआयचा वापर यावर्षी वाढणार आहे. किंबहुना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एआयला पर्याय नाही असं दिसत आहे. त्यामुळे येतं वर्ष हे एआयचं वर्ष असेल.





