विज्ञानविश्व : सोलर जिओइंजिनीअरिंग

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आता प्रचंड वेगाने वाढतो आहे. पृथ्वीचं चढतं तापमान रोखण्याचे आपले छोटेमोठे प्रयत्न अपुरे पडायला लागले आहेत. त्यामुळे आता एकच मोठा उपाय ग्लोबल पातळीवर करावा लागेल, असं तज्ज्ञांचं मत होत चाललं आहे.
असा कोणता उपाय आपल्याकडे आहे? ग्लोबल वॉर्मिंगच्या मुळाशी मुख्य कारण आहे पृथ्वीच्या वातावरणातला वाढता कार्बन. यामुळे पृथ्वीवर एक उबदार असं आवरण तयार होतं आणि त्या आवरणाखाली उष्णता वाढत जाते. हे आवरण कमी उबदार करायचा प्रयत्न गेले अनेक दशकं सुरू आहे. पण त्याचे परिणाम हवे तितके दिसत नाहीत. त्यामुळे सूर्याकडून पृथ्वीकडे येणाऱ्या उष्णतेचंच प्रमाण कमी करण्याचा उपाय आपल्या हातात उरला आहे.
जिओइंजिनीअरिंग किंवा भू-अभियांत्रिकी ही अलीकडे उदयाला आलेली एक विज्ञानशाखा. पृथ्वीच्या हवामानाशी संबंधित प्रक्रियांमध्ये बदल करून हवामानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न हे या शाखेचं उद्दिष्ट आहे. हवामान बदलाचं संकट नवीन आहे, तेव्हा त्यासाठी तसेच नवीन प्रयोग करून पाहिले जातात. तप्त सूर्यकिरणांचा प्रभाव कमी करण्यावर जिओइंजिनीअरिंगचा आतापर्यंत भर होता. हे किरण परावर्तित करणारे रंग किंवा वितळत्या बर्फावर प्रकाश परावर्तन करणाऱ्या चादरी असे अनेक चांगले उपाय त्यातून मिळाले. आता मात्र मोठ्या प्रमाणावर काही करायचं असेल तर पृथ्वी सोडून पुढे जायचं, वातावरण किंवा थेट अवकाशातून सोलर जिओइंजिनीअरिंग करायचं, याला पर्याय नाही, असं वाटायला लागलं आहे.
वातावरणात विशिष्ट रसायनांचा फवारा मारून सूर्याचा दाह काही प्रमाणात वरच्यावर परत पाठवणे ही त्यातली एक कल्पना. हार्वर्ड विद्यापीठाने तिला उचलून धरलं आहे आणि त्यावर संशोधन केलेलं आहे. एखादं औषध योग्य प्रमाणात वापरून आपण रक्तदाब किंवा मधुमेह नियंत्रणात ठेवतो, त्याच धर्तीवर या प्रयोगांकडे पहायला हवं, असं हार्वर्डच्या संशोधकांचं म्हणणं आहे.
या उपायांचे काही विपरीत परिणाम आपल्यावर होतील का? अन्न उत्पादन घटेल का? भूगर्भात काही घडामोडी घडतील का? याची अजून तितकी सुसंगत मॉडेल्स आपल्याकडे नाहीत. त्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, आपण प्रयोग करताना थोडी सावधगिरी बाळगणं जरुरी आहे. वेगवेगळ्या कॉम्प्युटर मॉडेल्सनुसार वातावरणात रसायनांची फवारणी करून ग्लोबल वॉर्मिंग रोखणं शक्य होईल.
मात्र त्याचा परिणाम दिसायला सुमारे दहा वर्षे लागतील. तोपर्यंत समुद्रातल्या निरनिराळ्या प्रवाहांमुळे आणि इतर घटकांमुळे स्थानिक पातळीवर तापमान वाढत राहील. दहा वर्षांनंतर तापमानवाढ थांबलेली दिसू शकेल आणि त्यानंतर कदाचित तापमान घटू लागेल. अर्थात, जगातली सगळी माणसं कॉम्प्युटर मॉडेल्सनुसार वागतील असं नाही आणि वातावरणात कार्बन सोडत राहण्याचं प्रमाण मर्यादेत राहील असंही नाही. तेव्हा आपण सर्व दृष्टींनी सावध राहायला हवं आणि एकूणच जीवनशैली बदलण्याकडे लक्ष ठेवायला हवं.





