ज्ञानदीप लावू जगी : निजधाम माझें

अहा कटकटा हें वोखटें । इये मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ।।515।। तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ।।516।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा
संत ज्ञानेश्वर महाराज श्री ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायात लिहितात, भागवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे पांडुपुत्रा मर्त्यांच्या या फसव्या, खोट्या जगात सर्व काही उलटे आहे. तू अकस्मात मृत्यूलोकात जन्मला आहेस. तरी तू सर्व गोष्टींचा परित्याग करून लवकर या प्रपंचातून बाहेर पड आणि भक्तीच्या मार्गाला लाग, कारण या भक्तीच्या योगाने तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील.
एकनाथ महाराजदेखील भावार्थ रामायणात म्हणतात,
झालिया नरदेह प्राप्ती। परमार्थ साधावा हातोहाती। जेवी कृषावळीची स्थिती। मढे झाकिती पेरनीशी।।
नाथ म्हणतात, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर तातडीने परमार्थ साधावा. ज्याप्रमाणे पेरणीच्यावेळी शेतकरी मढे झाकून पेरणी करतात, त्याचप्रमाणे इतर सर्व कामे बाजूला ठेवून परमार्थ पहिले करावा.





