नेवासा : एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास

नेवासा – कामिका एकादशीला संत ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना वाहतूक गोंधळामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पहाटे हजर न झाल्याने ‘नो एंट्री’च्या फलकाकडे लक्ष न देता वाहनचालकांनी वाहने मंदिराकडे नेली. त्यामुळे पायी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचे हाल झाले.
महसूल आणि पोलीस प्रशासनाने तीन नियोजन बैठका घेऊन वाहतूक व्यवस्थेचा काटेकोर बंदोबस्त करण्याचे ठरवले होते. मात्र, प्रत्यक्षात पहाटे मंदिर मार्गावर बॅरिकेडिंग आणि वाहतूक नियमनासाठी कोणतेही पोलीस उपस्थित नव्हते. यामुळे भाविकांना रस्ता मोकळा दिसताच वाहनांनी मंदिर परिसरात गर्दी केली, आणि वाहतूक कोंडी झाली. यामुळे दर्शनाच्या रांगा लांबल्या, आणि भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.
नेवासा तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील सूचना निष्फळ ठरल्या. प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे भाविकांमध्ये संताप आहे. “बैठका घेऊनही व्यवस्था ढासळली,” अशी खंत भाविकांनी व्यक्त केली. यापुढे अशा चुका टाळाव्यात, अशी मागणी होत आहे.





