Ashadhi Wari 2026 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २४ जुलै रोजी पंढरपूर येथे आगमन होणार आहे. आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली. या वर्षी १७ दिवसांच्या वारीत ४ गोल व ३ उभे रिंगण होणार आहेत. यासंदर्भात संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पडली. बैठकीला संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड.रोहीणी पवार, दिंडी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चैत्र दशमीपासून वारीच्या नियोजनाची परंपरा असून त्यानुसार प्रस्थान, मुक्काम व अन्य बाबींचा आढावा घेण्यात आला. या गावांमध्ये असणार मुक्काम – कार्यक्रमानुसार ८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर ९ व १० जुलै पुणे, ११ व १२ जुलै सासवड, १३ जुलै जेजुरी, १४ जुलै वाल्हे, १५ जुलै नीरा स्नानानंतर लोणंद, १६ जुलै चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होऊन तरडगाव येथे मुक्काम असेल. १७ जुलै फलटण, १८ जुलै बरड, १९ जुलै नातेपुते, २० जुलै पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन माळशिरस, २१ जुलै खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर, २२ जुलै ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण व टप्पा येथे बंधू भेट होऊन भंडीशेगाव येथे मुक्काम असेल. दि.२३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल व उभे रिंगण होऊन वाखरी येथे पालखी विसावणार आहे. २४ जुलै रोजी आषाढ दशमीला पंढरपूर येथे सर्व संतांच्या पालख्या दाखल होणार आहेत. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता शेकडो मैल पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आतुर असतात. यंदाही वारीची ओढ भाविकांमध्ये वाढली असून प्रशासनाकडे विविध सोयी-सुविधांबाबत मागण्या मांडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.