विविधा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

– माधव विद्वांस
संत ज्ञानेश्वरांना “ताटीचे अभंगातून’ बोध देणाऱ्या संत मुक्ताबाई यांची वैशाख वद्य दशमी/वैशाख वद्य द्वादशी रोजी पुण्यतिथी मानली जाते. मुक्ताबाई वादळात जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) येथे अडकल्या, त्यावेळी वीज पडली व त्यातच त्या अंतर्धान पावल्या. त्यांना अवघे 20 वर्षांचे आयुष्य लाभले.
संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकटी बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचिलेले “ताटीचे अभंग’ हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहे. त्यांनी “ज्ञानबोध’ या ग्रंथाचेही लेखन केले आहे, असे संशोधनांती स्पष्ट होते.
या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते. मुक्ताबाईंचे “मुंगी उडाली आकाशी’ हे पद्माकर गोवईकरांचे कथानक खूपच छान आहे.
मुक्ताबाईंच्या नावावर एकूण 42 अभंग आहेत. तसेच त्यांच्या सहा अभंगात मुद्रिका “मुक्ताई म्हणे’ अशीच आहे. याशिवाय नामदेव गाथेतील “नामदेव-भक्तिगर्वपरिहार’ या मथळ्याखालील अभंगांपैकी (1334 ते 1364) दहापंधरा तरी निश्चितपणे मुक्ताबाईंचे मानले जातात. त्यांची एकूण अभंगरचना पाऊणशेच्या घरात जाईल. ती सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहे.
एकदा ज्ञानदेवांना पाहून कोणीतरी त्यांना हिणवले. तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या ताटीचे दार उघडत नव्हते. तेव्हा मुक्ताबाईंनी ज्या विनवण्या केल्या त्या “ताटीचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. या अभंगात त्यांचा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा दिसून येतो. तसेच भावाप्रमाणेच विचारशक्तीचीही कल्पना येते. संत नामदेव मुक्ताबाईंविषयी म्हणतात, “लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत’. मुक्ताबाईंच्या काव्यात त्यांच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू दिसून येतात. मुक्ताबाईला निवृत्तीनाथांचे मार्गदर्शन होते. त्यामुळे “मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।’ अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे त्या सांगतात. मुक्ताबाईंच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, त्यांचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो.
ताटीचा अभंग-
चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही
संते सुखें व्हावें पाणी
शब्द शस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्म दोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ब्रह्म जैसें तैशा परी
आम्हां वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चावली
कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा





