पौड – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊली महावैष्णव चक्रवर्ती सम्राट संत ज्ञानोबाराय यांचे सगुण साकार रूप नाचणीच्या पिकामधून साकारण्यात आले आहे. हे आगळंवेगळं आकर्षण वातुंडे (ता. मुळशी) येथील महादेव राघू शिंदे व नामदेव राघू शिंदे यांच्या शेतामध्ये उभे करण्यात आले आहे. या भव्य सगुण रूपामागे संकल्पना स्वरा लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे हिची आहे. मूर्तीचे एकूण क्षेत्र सुमारे ४० गुंठे (१ एकर) असून त्याचे माप २०० फूट x १५० फूट आहे. हे सगुण रूप २१ दिवस सर्व भक्तांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. या उपक्रमाचे आयोजन ज्ञानांकुर प्रतिष्ठान, वातुंडे या सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने करण्यात आले आहे. सहकार्य ओम साई ग्रुप, वातुंडे, भोडे ग्रामस्थ यांनी केले असून मार्गदर्शन लाभले आहे. मुठा खोरे वारकरी सांप्रदाय समिती, गोऱ्हेकर दिंडी क्रमांक ११, शेडगे पंच मंडळी, दिंडी क्रमांक ४ (माऊलींच्या रथापुढे) व मुळशी तालुका दिंडी क्रमांक ९६ (माऊलींच्या रथामागे) तसेच सेवा फाउंडेशन, पुणे या सर्वांचे. या अद्वितीय साकार मूर्तीमुळे संत परंपरेतील श्रद्धा, भक्ती आणि वैष्णव परंपरेचा संदेश सर्वदूर पोहोचत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधूनही भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.