विशेष : संयुक्त महाराष्ट्राचे सारथी – एसेम जोशी

-अॅड. बाबुराव कानडे
जुन्नर येथे श्रीधर महादेव जोशी यांचा 12 नोव्हेंबर 1904 रोजी जन्म झाला. जुन्नरच्या मातीतच शिवाजीराजे जन्माला आल्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि निधर्मीपणा हे बाळकडू एस. एम. जोशींना जुन्नरच्या मातीत मिळाले. जन्मदिनी त्यांच्या कार्याचा आढावा…
श्रीधर महादेव जोशी ऊर्फ एस. एम. जोशी या नावाने ओळखले जात. त्यांचा अतिशय साधा पोषाख असे. खादीचा पायजमा, खादीचा शर्ट आणि जाडाभरडा कोट अशा अवतारामध्ये एस. एम. जोशी वावरत असत. त्यांचे शिक्षण रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांचा सांगाती गोपीनाथ तळवलकर यांनी “माझा सांगाती’ हे चरित्र लिहिले आहे.
फर्गसन कॉलेजमधून एमएपर्यंत शिक्षण घेतले. एमएच्या टर्म भरण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसताना काकासाहेब गाडगीळ यांच्या प्रथम पत्नी आनंदीबाई गाडगीळ यांनी पाटल्या काढून जोशींच्या हातात ठेवल्या होत्या. जोशी व काकासाहेब गाडगीळ यांचे संबंध अतिशय स्नेहपूर्ण व घरगुती होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये कॉंग्रेस पक्षाबरोबर जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव आणि महाराष्ट्रातील अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, रामभाऊ वडके, शिरुभाऊ लिमये ही एक जहाल मंडळी देखील होती. या मंडळींनी भूमिगत चळवळीमध्ये भाग घेऊन स्वातंत्र्यासाठी तुरुंगवासही पत्करलेला होता. एस. एम. जोशी यांनी “इमामसाहेब’ हे नाव घेऊन भूमिगत झाले होते. अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे भूमिगत झालेले पुढारी मुंबईतील आचार्य अत्रे यांच्या आमोद हाऊस या निवास स्थानांमध्ये आश्रयाला होते. कॉंग्रेसमध्ये असलेला जहाल गट ज्याला नंतर समाजवादी गट असे संबोधले जाते, त्यांनी एक मोठी क्रांती ऑगस्टमध्ये केली. तिला 9 ऑगस्ट 42 ची क्रांती असं म्हणतात. या क्रांतीमध्ये अरुणा असफ अली आणि समाजवादी गटाची कामगिरी फार मोठी होती.
एस. एम. जोशी हे समाजवादी होते. सुरुवातीच्या काळामध्ये सरकारविरोधी कामगारांचा मोर्चा आणल्यामुळे त्यांच्यावर लाठीमार झालेला मी पाहिलेला आहे. ते ऍम्युनिशन फॅक्टरीच्या कामगारांचे सेक्रेटरी होते आणि आचार्य अत्रे ऍम्युनिशन फॅक्टरीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. त्याच वेळेला नंतरच्या समता पार्टीचे संस्थापक कांशीराम हे ऍम्युनिशन फॅक्टरीमध्ये सुपरिटेंडेंट होते. मी लखनऊमध्ये कांशीरामला भेटलो होतो. कांशीराम सांगतात की, आचार्य अत्रे आणि एस. एम. जोशी हे माझ्या गुरुस्थानी आहेत. समतेचे आणि समाजवादाचे शिक्षण या दोघांकडून मी घेतलेले.
पुण्यामधील ऍम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामगारांच्या झुंडीच्या झुंडी सायकलवरून जात. त्यांचे नेतृत्व एस. एम. जोशी करत असल्याचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांच्या घरी आम्हाला नेहमीच जायला मिळत असे. आम्ही छोटी मुले असूनसुद्धा मोठ्या आपुलकीने ते आमच्याशी बोलत. ताराबाईंचे बंधू म्हणजे ज्ञान प्रबोधिनीचे आप्पासाहेब पेंडसे हे होत. उच्चशिक्षित घराण्यातून आलेल्या एस. एम. जोशी यांच्या पत्नी ताराबाई या देखील अतिशय साध्या खादीची पांढरी साडी वापरत असत. ताराबाईंनी तुरुंगात जाणाऱ्या आपल्या यजमानांना नेहमीच साथ दिली आहे. एस. एम. जोशी यांना अजय आणि अभय नावाचे दोन मुलं. अजय हा लहान मुलांचा डॉक्टर बनला आणि अभय देशाचे संरक्षण करण्यासाठी मिलिटरीमध्ये दाखल झाला.
एकदा एस. एम. जोशी यांच्याबरोबर तात्याराव सावरकर यांना भेटण्याचा योग आला. तो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा काळ होता. वि. दा. सावरकरांना खासगीत लोक “तात्याराव’ असं म्हणत असत. सावरकरांची आणि एस. एम. जोशी यांची भेट झाली असता सावरकर श्री म जोशी असा उल्लेख करत असत. कारण त्यांची मराठी शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली होती. “हे बघा, श्री. म. तिकडे आंध्रसाठी पोटी रामल्लू उपोषणाला बसलेले आहेत आणि तुम्ही मात्र महाराष्ट्राकरता कुठलीही हालचाल करायला तयार नाहीत.’ त्यावेळेला अण्णा म्हणाले, (अण्णा हे जोशींचे खाजगीतले नाव) “कसा लढा उभारावा याबद्दल शंका वाटते.’
सावरकर म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेच्या आशा-आकांक्षा, राग, लोभ, द्वेष, क्रोध इत्यादी भावना आचार्य अत्रे यांच्या मुखातून बाहेर पडतात. आचार्य अत्रे हे मराठी मनाचा बॅरोमीटर आहे.’ मग मात्र एस. एम. जोशी यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आम्हीही चळवळ करू, अशा प्रकारचे आश्वासन दिले. याप्रसंगी मी आणि माझ्यासारखी धडपडणारी मित्रमंडळी अण्णांच्या बरोबर होतो. हा संवाद ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्याबद्दल आम्ही अण्णांचे आणि सावरकरांचे अतिशय ऋणी आहोत. महाराष्ट्रातली मोठमोठी पुढारी मंडळी तुरुंगामध्ये गेली होती.
एस. एम. जोशी मात्र तुरुंगाच्या बाहेर होते. लोणार आळीतल्या गणपती मंडळांनी एक सभा बोलावून एस. एम. जोशी यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व करण्याची सूचना केली आणि अध्यक्ष स्थान केशवराव जेधे यांनी भूषवावे असे ठरले. अशा रीतीने महाराष्ट्रातील लढवय्ये नेते तुरुंगात असताना संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.
22 नोव्हेंबरला 1955 ला फ्लोरा फाउंटनवर सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्र्यांनी त्रिराज्य योजनेला विरोध करण्यासाठी मोर्चा काढलेला असताना एस. एम. जोशी विधानसभेमध्ये त्रिराज्य योजनेला विरोध करत होते. बेळगावचे 6 हुतात्मे आणि मुंबई गोळीबारातील 100 हुतात्मे असे 106 हुतात्मे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामी आले.
1 मे 1960 रोजी भारताच्या नकाशावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र विराजमान झाला. जनतेवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आयुष्य चंदनासारखे झिजवणारे एसेम जोशी यांना जीवन पूर्णपणे कळले होते. समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्राचं स्वप्न एसेम यांचे अपूर्ण राहिले. महाराष्ट्राच्या या महापुरुषाचे 1 एप्रिल 1985 रोजी पुण्यामध्ये निधन झाले. या थोर नेत्यास अभिवादन.





