67 वर्षांपूर्वी प्रभात : शुक्रवार, ता. 18 माहे सप्टेंबर सन 1953

भारताने यूनोमधून बाहेर पडावे ही सूचना देशहितास विघातक
अलिप्ततावादी धोरण अवलंबिणे अव्यवहार्य : भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत नेहरूंचे विचार
नवी दिल्ली – धर्माबाबतचे योग्य मूल्यमापन नसलेल्या जुन्या धर्मवेड्यांच्या वृत्तीनुसार आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे पाहण्याच्या वृत्तीचा आज पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांनी भारतीय लोकसभेत धिःकार केला.
आज भारतीय लोकसभेत पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे स्पष्टीकरण करणारे दीर्घ भाषण केल्यानंतर त्यावर चर्चा होऊन सरकारच्या परराष्ट्रीय धोरणास सभागृहाने प्रचंड बहुमताने पाठिंबा दर्शविला. काश्मीर प्रश्न यूनोतून काढून तो न्याय्य आणि लोकशाही मार्गांनी सोडविण्यासाठी योग्य ती परिस्थिती निर्माण करण्यास सरकारचे परराष्ट्रीय धोरण असमर्थ ठरले आहे अशा स्वरूपाची उपसूचना प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आली.
ब्रिटिश राष्ट्र-समूहात राहिल्याने आपल्या देशाचा फायदाच झाला आहे असे सांगून पंडितजी म्हणाले, “”आम्ही कोणासही घाबरत नाही कारण आम्हाला कोणत्याही राष्ट्राविरुद्ध कोणतीही कारवाई करावयाची नाही आणि त्याचवेळी आमच्या सरहद्दीवरील कोठूनही, कोणाकडूनही आक्रमण झाल्यास प्रतिकार करण्यासही आम्ही समर्थ आहो.”
विकृत मनोवृत्तीचे द्योतक
भारताने यूनोतून बाहेर पडावे ह्या मागणीबद्दल ते म्हणाले, “”ही विचारसरणी अपरिपक्व मताची द्योतक आहे. आपणापुढे उभे ठाकलेल्या प्रश्नापासून पळ काढण्याची ही वृत्ती आहे. यूनोत अनेक दोष असतील, अनेक उणीवा असतील; तरीही ती एक जागतिक संघटना आहे, आणि त्या संघटनेत आशा आणि शांतता ह्यांची बीजे आहेत. तेव्हा ही संघटना संपूर्णपणे आपणास पाहिजे तशी नाही म्हणून ती नष्ट करावी हे विकृत मनोवृत्तीचे द्योतक आहे. ह्या जगात आपण एकाकी राहणे शक्य नाही. पूर्वी सामाजिकदृष्ट्या आपण अलिप्ततावादी धोरण स्वीकारले म्हणून आपण निर्बल झालो आणि जग मात्र पुढे चालले. तेव्हा यूनोतून बाहेर पडण्याचे हे अलिप्ततावादी धोरण आपण मान्य करू शकत नाही.”





