49 वर्षांपूर्वी प्रभात | प्रत्येक व्यक्तीच्या मिळकतीवर सिलिंग बसविणार

राज्यासाठी नियोजन मंडळ जिल्ह्यांतही अशीच मंडळे!
मुंबई, ता. 24 – महाराष्ट्र राज्यासाठी एक राज्य नियोजन मंडळ स्थापन करण्यात येणार असून अशा प्रकारची नियोजन मंडळे जिल्ह्यांसाठीसुद्धा स्थापन करण्यात येणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्यासंबंधी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहणार. एक नवीन जिल्हा नियोजन मंडळ कार्यकारी मंडळ ह्या स्वरूपात राहील. हे मंडळ विविध योजनांच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा परिषदेसह सर्व एजन्सीच्या कार्यात सुसूत्रता आणील.
अजून दहा वर्षे लढू
हॉंगकॉंग – आमच्या जवळ सर्व प्रकारच्या वस्तू व शस्त्रास्त्रांचा भरपूर साठा आहे. आम्ही दीर्घकाळ युद्ध लढू शकू. आम्ही जबर प्रतिकार करू शकू. पाच किंवा दहा वर्षेही लढण्याची तयारी आहे, असा दावा उत्तर व्हिएतनामने आज केला.
प्रत्येक व्यक्तीच्या मिळकतीवर सिलिंग बसविणार
नवी दिल्ली – शहरी मालमत्ता व ग्रामीण शेती यांच्यावर सिलिंग (निर्बंध) घातल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मिळकतीवरच सिलिंग घालण्याचा भारत सरकारचा विचार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी काल राज्यसभेत सूचित केले. अर्थविषयक विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, सामाजिक न्याय व विषमता कमी करण्यासाठी हा उपाय करणे सरकारला आवश्यक ठरणार आहे.
कुटुंब नियोजन खात्याने”इकडे’ही लक्ष द्यावे
सेऊल – दक्षिण कोरियातील प्राथमिक, दुय्यम व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून कुटुंब नियोजन व लैंगिक विषयाचे ज्ञान देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसंख्येला आळा बसेल अशी माहिती आरोग्य-सामाजिक खात्याच्या मंत्रालयाने जाहीर केली आहे.





