विविधा : पद्मा चव्हाण

-माधव विद्वांस

पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर येथे 7 जुलै 1944 रोजी झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण घेऊन शाळेला रामराम ठोकला. त्यांना चंदेरी दुनियेची ओढ होती. त्यावेळी कोल्हापूर चित्रनगरी म्हणून प्रसिद्ध होती. त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण हे आधुनिक विचारांचे असल्याने आपल्या कन्येला त्यांनी विरोध केला नाही. बोलके डोळे, भाव बदलणारा सुरेख चेहरा तसेच अभिनेत्रीला आवश्‍यक असणारे आकर्षक व्यक्‍तिमत्त्व त्यांच्याकडे होते. वर्ष 1959 साली भालजी पेंढारकर यांच्या “आकाशगंगा’ या चित्रपटात पद्मा यांना भूमिका मिळाली व त्यांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला.

चित्रपटांबरोबरच नाट्यमंचावरही त्यांचे आगमन झाले. त्यांचे अभिनय शहरी व ग्रामीण कथानकानाही पूरक होते. दिलखेचक व बिनधास्त अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या अभिनयामुळे महाराष्ट्राची “मर्लिन मन्‍रो’ व “सौंदर्याचा ऍटमबॉम्ब’ हे किताब आचार्य अत्रे यांनी त्यांना दिले होते. “गुंतता हृदय हे’ या नाटकातील “कल्याणी’, “नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल’ मधील “सुनीता’, “माझी बायको माझी मेव्हणी’ मधील “रसिका,’ “लग्नाची बेडी’ मधील “रश्‍मी’ अशा अनेक भूमिकांमुळे त्यांची नाटके प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतली. प्रसंगानुरूप मेकअप, वेशभूषा, आवश्‍यक तेथे लडिवाळपणा, नेत्रकटाक्ष आणि बिनधास्त संवादफेक यामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर त्यांनी जणू अधिराज्य केले होते.

अभिनयाची घोडदौड सुरू असताना दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी 1966 मध्ये त्यांचा विवाह झाला. पद्मा यांनी “आकाशगंगा’, “अवघाची संसार’, “जोतिबाचा नवस’, “संगत जडली तुझी न माझी’, “बोट लावीन तिथे गुदगुल्या’, “लाखात अशी देखणी’, अशा अनेक मराठी चित्रपटांत अभिनय केला. सुमारे 28 मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

मराठीबरोबरच पद्मा यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. अनेक वेळा नकारात्मक, खलनायकी भूमिका केल्या. वर्ष 1968 मध्ये “आदमी’ या चित्रपटामध्ये अशोककुमार, मनोजकुमार, वहिदा रहेमान यांच्याबरोबरही त्यांनी काम केले. वर्ष 1963 मधील “बिन बादल बरसात’ या चित्रपटात आणि “कश्‍मीर की कली’मध्ये शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबरही त्यांनी अभिनय केला. वर्ष 1975 मध्ये “या सुखांनो या’ आणि वर्ष 1976 मध्ये “आराम हराम आहे’ या चित्रपटातील भूमिकांबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. एका मोटार अपघातात 12 सप्टेंबर 1996 रोजी या अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.