विशेष : क्रांतदर्शी जीवन आणि तत्त्वज्ञान

भगवान महावीरांचे विचार जगाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. त्यांच्या विचारतत्त्वांचा अंगीकार करण्याची आज खरंच गरज आहे. महावीर जयंतीच्या निमित्ताने हा विशेष लेख.
मानवता हे भगवान महावीरांच्या जीवनकार्याचे सार होते. सम्य्कता हा त्यांच्या चिंतनाचा प्राण होता. लोकल्याणकारी जीवनाची समग्रता त्यांनी केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर नेऊन पोहोचविली. महावीरांच्या समाजचिंतनामध्ये गगनाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य होते. त्यामुळे त्यांच्या प्रवचनातील नैतिक मूल्य संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि जीव-अजीवातील समानतेचा विचार हा वर्तमानसंदर्भातही तेवढाच सुसंवादी असल्याचे दिसून येते. भगवान महावीरांनी सम्य्कतेचे त्रिविध पैलू रत्नकरंडकात अधिष्ठित केले. त्यातील प्रखर तेज:पुंज असा द्रष्टा विचार अंधारातून प्रकाशाकडे पोहोचण्यासाठी आजही प्रेरक असल्याचे दिसून येते.
द्वंद्व, प्रतिद्वंद्व आणि समन्वय या कार्ल मार्क्सच्या विचारातील द्वंद्वात्मक भौतिकवादी दृष्टीने इसवीसन पूर्व महाकाव्य शतकामधील इतिहासाची चिकित्सक मीमांसा करता असे दिसते की, महावीरांचा विचार हा संघर्षातून समन्वयाकडे जातो व त्यातून नवजीवनाची मांडणी करतो. सर्व प्रकारच्या दारिद्य्रात विचारांचे दारिद्य्र हे अधिक भयावह आहे, असे महावीरांनी कार्ल मार्क्सच्या अगोदर 2500 वर्षांपूर्वी निर्भयपणे प्रतिपादन केले होते. नवभारताची जडणघडण ही श्रेष्ठ मानवी मूल्यावर व्हावी असा त्यांचा प्रामाणिक आग्रह होता. भगवान महावीरांची प्रवचने अभ्यासली असता त्यातून प्रकटणारे नैतिक मूल्यांचे सार हे वर्तमानकालीन जडभौतिक अर्थविचारांपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे दिसून येते.
राष्ट्र, जग आणि माणूस
आपल्या राष्ट्रीय अस्मितेला आणि विचारविश्वाला जागतिक परिमाण प्राप्त करून देण्याचे श्रेय आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांकडे जाते. परंतु इ.स. पूर्व 6 व्या शतकामध्ये असे कार्य भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांनी केले. त्यांच्या अथक परिश्रमातून भारतीय मानवतावादाचे दर्शन हे सातासमुद्रापलीकडे पोहोचले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी जर्मन विचारवंत हर्मन जॅकोबी यांनी भगवान महावीरांचे विचारचरित्र लिहिले व त्यांचा विचार जगभर पोहोचला. या महान तत्त्वचिंतकाने म्हटल्याप्रमाणे महावीरांनी त्या काळी अनेकांतवाद, जीव-अजीवांची समानता, चरित्राचे संवर्धन, अहिंसा ही मूल्ये उच्चरवाने मांडली, त्यामुळे त्यांच्या प्रागतिक विचारांचे संदेश हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले. विल ड्युरांट यांनी “अवर ओरिएंटल हेरिटेज’ या खंडात त्यामुळे जगभरातील इसवीसन पूर्व सतराव्या शतकात बंडखोरी आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच्या निषेधाचे शतक म्हटले आहे. कर्मकांड, यज्ञयाग आणि पशुबळी यांसारख्या अमानवी प्रथांना तिलांजली देऊन मानवमुक्तीचा नवा जाहीरनामा या दोन महान भारतीय दार्शनिकांनी दिला. अनेक पैलूंचा विचार करता असे दिसते की, ते काळाच्या पुढे होते. प्रगत विचारांची मुहूर्तमेढ रोवण्यात ते जगात पहिले होते.
अहिंसा हे भगवान महावीरांनी दिलेले योगदान केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरले आहे. महावीरांच्या अहिंसा तत्त्वात भ्याडपणा नाही तर त्यात प्रत्युत्तराचे प्रबळ सामर्थ्यही आहे. आपण अहिंसक आहात याचा अर्थ दुबळे आहोत असा नव्हे तर त्यामध्ये परचक्राशी सामना करण्याचे सामर्थ्यही आहे. महावीरांच्या या प्रभावी तत्त्वज्ञानामुळे कलींग सम्राट खारवेलसारखे अनेक वीर या धर्माचे अनुयायी बनले. भगवान महावीरांच्या क्रांतदर्शी विचारांचे सार हे त्यांच्या सकारात्मक विचारधारेत आहे. भगवान महावीरांच्या अहिंसा तत्त्वामुळे भारतासारख्या एकसंध व अखंड राष्ट्राला प्राचीन काळात अन्य प्रदेशावर आक्रमण करण्याची गरज पडली नाही. कारण, भारताला आपल्या समृद्ध वैभवशाली परंपरेमुळे अन्य प्रदेशावर आक्रमण करणे अप्रस्तुत वाटले. भगवान महावीरांच्या विचारामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणातील स्वावलंबन, सहजीवन व सहअस्तित्व या कल्पना विकसित झाल्या. महात्मा गांधीच्या “सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेमध्येही महावीरांच्या विचारांचा प्रभाव दिसतो.
चारित्र्यसंवर्धन प्राणतत्त्व
सम्यक् ज्ञान, सम्यक् दर्शन व सम्यक् चारित्र्य ही भगवान महावीरांच्या रत्नकरंडकातील त्रिरत्ने आहेत. ज्ञान, व्यवहार आणि चारित्र्य यातील संतुलनाचा मूलभूत विचार भगवान महावीर मांडतात. त्यामुळे महावीरांचा भर हा आचारधर्मावर आहे. आचार आणि विचार यामधील संतुलनावर त्यांनी भर दिला आहे. आचार्य समंतभद्र यांनी भगवान महावीरांच्या विचारांचे हे सूत्र अत्यंत प्रभावीपणे विकसित केले आहे व त्या आधारे स्वतंत्र स्वयंभू ग्रंथराज रचिला आहे. “जैन धर्माचे समाजशास्त्र’ असे या ग्रंथाचे वर्णन करावे लागते ते खरोखर अर्थपूर्ण आहे.
तत्त्वसार अमृतवाणी
महावीरांच्या जीवनाचे तत्त्वसार हे त्यांच्या अमृतवाणीतून प्रकटले आहे. त्यांच्या प्रवचनात भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व एकवटले आहे व प्रकटले आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही त्यांच्या तत्त्वज्ञानातील अमर बीजे आहेत. अपरिग्रह व अस्तेय ही तत्त्वे सत्यकथनाचा विस्तार आहेत. महात्मा गांधीच्या जीवन प्रवाहातील कबुलीचा विचार हा सत्यकथनाचा प्रभावी प्रयोग होय. आपल्या प्रभावी अमृतवाणीतून महावीरांनी सारा भारतवर्ष मंत्रून टाकला होता. ज्ञान प्राप्त झाल्यापासून पावापुरी येथे महानिर्वाण होईपर्यंत महावीरांनी अखंड आणि अहर्निश संचार करून आपल्या नैतिक तत्त्वांचा प्रसार केला. जैन धर्मातील भगवान महावीरांच्या योगदानाचे खरे तेजाची रूप हे त्यांच्या दूरदर्शी मानवतावादात आहे. त्यांच्या विचार व कार्याने पावन झालेले भारतामधील अनेक पवित्र स्थानांचे वैभव पूर्वीप्रमाणे आजही तेवढेच तेजस्वी राहिले आहे. हिमालयाच्या कैलास शिखरापासून ते दक्षिणेकडील तामिळनाडूतील सतन्नवसलपर्यंत ही स्थाने पसरली आहेत. त्यामध्ये महावीरांच्या पवित्र कार्याचे तेजस्वी दर्शन घडते.
एकूणच भगवान महावीरांच्या जीवनकार्याचे खरे स्वरूप हे त्यांच्या तत्त्वज्ञानात आहे. महावीरांच्या विचार व कार्याचे स्मरण करताना त्यांच्या प्रभावी विचार प्रबोधनात प्रकट होते. काळ किती पुढे गेला तरी महावीरांच्या विचाराचे विलक्षण तेज सतत प्रकाशमान होत राहील व नित्य नवा संदेश देत राहील. भगवान महावीरांच्या क्रांतदर्शी विचारांचे खरे सार त्यांच्या प्रगमनशील तत्त्वज्ञानात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.





