विशेष | सुरांची मोहिनी : लतादीदी

आज एक वर्ष पूर्ण झालं, लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. पण “मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ तसे त्यांच्या सुरांची मोहिनी प्रत्येकाच्या मनावरच अधिराज्य गाजवत आहे. आज 6 फेब्रुवारी रोजी त्यांचा पहिला स्मृतिदीन. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी…
लता मंगेशकर हे नाव माहीत नसेल अशी व्यक्ती दुर्मिळच असेल. लतादीदींवर लिहायचं म्हटल्यावर सूर्याला काजवा दाखवण्यासारखा आहे. “न भूतो न भविष्यती’ या म्हणीप्रमाणे, लिहिण्यासाठी कागद आणि शाई कमी पडेल. आम्हा रसिक श्रोत्यांसाठी आयुष्यभर पुरेल एवढी गाण्याची शिदोरी देऊ केली आहे. लतादीदींच्या चेहऱ्यावरचे निखळ हास्य त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जणू मधाचे नव्हे अमृताचे थेंब पाझरून आपल्या कानाला तर तृप्त करतातच पण मनालाही गोडवा निर्माण करतात, असं वाटतं. दैवी देणगी लाभलेलं सुरेख उदाहरण म्हणजे लतादीदी. आम्हा श्रोत्यांचे भाग्य थोर म्हणून तुमची गाणी आम्हाला ऐकायला मिळत आहेत. तुमच्या रुपात आम्हाला साक्षात सरस्वतीचा आवाज ऐकायला मिळतोय. मनाच्या गाभाऱ्यातून तुमचा आवाज कळसापर्यंत नव्हे गगनालाच भिडतो, असं वाटतं.
लतादीदींच्या आवाजातलं माता सरस्वती शारदा साक्षात सरस्वतीचं गाणं गात आहे. लतादीदींच्या रूपात असं वाटतं, एक प्यार का नगमा है, समझोता गमों से करलो, जिंदगी प्यार का गीत है, मै ना भूलूंगा, मैने कसम ली, जनम जनम का साथ, तुजसे नाराज नही जिंदगी, जिंदगी की यही रीत है, आदमी मुसाफिर है. अशी अनेक प्रकारची गाणी आजही काळजाचा ठाव घेतात आणि मनात होकारार्थी भावना जाग्या करतात, असं वाटतं.
लादीदींची मराठी, हिंदी, भावगीत, भक्तिगीत हजारो प्रकारची गाणी आहेत. “उंबरठा’ या मराठी चित्रपटातील “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, “चांद मातला’ ही गाणी तर अनेकांच्या फोनची रिंगटोन्स आहेत. “आजी सोनियाचा दिनु’ हे गाणं रेडिओवर लागलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. लतादीदींची गाणी ऐकून मनावरची मरगळ, ताण क्षणात निघून जातो. “जिंदगी प्यार का गीत है’ हे “सौतन’ चित्रपटातील मोटिव्हेशनल गाणं, “जंग’ चित्रपटातील “जिंदगी हर कदम एक नई जंग है’, माझ्या जीवनात आलेल्या अनेक प्रसंगात लतादीदींच्या गाण्यांनी मला साथ दिली. दुःखातही आनंदाने जगण्याची वाट दाखवली, माझ्या निराश झालेल्या मनाला लतादीदींच्या गाण्यांनी पुन्हा आशेचा किरण दाखवला. लहानपणापासूनच रेडिओ ऐकण्याचं बाळकडू मला वडिलांकडून मिळालं. वडील लहान होते तेव्हा रेडिओवरची गाणी ऐकता ऐकता झोपी जायचे तेव्हा आजोबा रेडिओ बंद करायचे. आई मला म्हणायची, अगदी बापाच्या वळणावर गेली आहेस. तेव्हा खूप आनंद वाटायचा. कारण वडिलांनासुद्धा जुनी गाणी ऐकण्याचा छंद होता, तोच मी पुढे जोपासत आहे. खरंच गाणी म्हणजे आपल्या सर्वांचा श्वास आहे आणि त्यात लतादीदींची गाणी म्हणजे दुग्ध शर्करा योगच.
गाणं म्हणजे गाणार मन, असं वाटतं. कुठलंही गाणं लागलं तरीसुद्धा आपण नकळत ते मनात गुणगुणत असतो. संगीत, गाणं ऐकायला आवडत नाही, असा मनुष्य विराळच असेल. व. पु. काळे यांनी म्हटलंच आहे, गाण्यांशिवाय दुसरे काय सौख्य आहे माणसाला? रोजचे मानसिक व शारीरिक त्रास गाण्याशिवाय कसे काय विसरायचे? भरभरून गाणी ऐका, कधीच डिप्रेशन जवळ येणार नाही, खरंच कधी कधी वाटतं, काही गाणी आपल्याला मोटिव्हेट करतात, जगण्याचं बळ देतात, जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच काही गाणी बदलून टाकतात, कोमेजलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्याचे काम हे गाणी करत असतात.
लतादीदींच्या एका मुलाखतीमध्ये मी ऐकलं होतं, त्यांना विचारण्यात आलं होतं, पुढचा जन्म घेतल्यास काय व्हायला आवडेल. त्यावर त्या म्हणाल्या, “नाही जनम मिले तो अच्छा है, मिला तो लता मंगेशकर होना नही चाहूंगी. क्यूकी लता मंगेशकर की तकलीफ खुद उसको पता हैं!’ प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे त्याने केलेला संघर्ष खूप मोठा असतो. लोकांना नाव प्रसिद्ध दिसते; पण त्यासाठी लागणारे कष्ट, तपस्या, त्याग इतरांना दिसत नाही. एखादा कलावंत कधीच मरत नाही. तो कायम अजरामर असतो. त्याच्या कलेतून तो कायम स्मरणात राहतो.
लतादीदींना सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने आदरांजली. एवढेच म्हणावेसं वाटते-
कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो आना और जाना है
दो पल की जीवन से इक उम्र चुरानी है
कविता –
आडनावातच जिच्या आहे मंगेश
जिभेवर जिच्या आहे सरस्वती
लता नाव उलट करतात
तिच्या नावातच आहे “ताल’
अशी ही सुरांची महाराणी
आपल्या अविट गीतांनी बहरवते
सगळ्यांच्या जीवनात सुगंधी सुरांची रातराणी





