“नेहरूंच्या उपस्थितीत असलेला कार्यक्रमही मोफत नव्हता…”; वडेट्टीवारांचा पुन्हा एकदा मंगेशकर कुटुंबावर हल्लाबोल

Vijay Wadditwar | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या रुग्णालय प्रशासनासह मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.
तसेच गाणं म्हटलं म्हणजे योगदान नाही, लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल, असेही त्यांनी म्हंटले होते. आता पुन्हा एकदा आज मंगेशकर कुटुंबांवर वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “तनिषा भिसे यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. मी मंगेशकर रुग्णालय आणि मंगेशकर कुटुंबीयांबद्दल वक्तव्य केलं, तर माझ्यावर टीका झाली. मात्र मला त्याची चिंता नाही. प्रकाश आमटे हे थोर समाजसेवक होते. त्यांना कर्करोग झाल्यावर दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
प्रकाश आमटेंकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही, असे सांगण्यात आले. नंतर उपचार सुरू झाले. मात्र, बाहेरून औषधी मागवण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये मागितले. महाराष्ट्र भूषण थोर समाजसेवकालाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सोडले नाही”, असे वडेट्टीवारांनी दावा करत आरोप केले. Vijay Wadditwar |
लता मंगेशकर यांचं विदर्भ साहित्य संघ कार्यक्रम
वडेट्टीवार म्हणाले, “विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. साहित्य संघाने तयारी करून संपर्क साधला. तेव्हा तिथून निरोप आला. पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, स्पेशल फ्लाईट करून द्या. त्यासाठी २२ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. चेकने देण्याची तयारी दर्शवल्यानंतर दीनानाथ मंगेशकर यांनी पैसे चेकने नाही, तर कॅशने द्या असे म्हटले. विदर्भ साहित्य संघाने, आम्ही संस्था असल्याने कॅशने पैसे देणं शक्य नाही, असे सांगितले. नंतर लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी हृदयनाथ मंगेशकर जे सांगत आहेत तसेच करा, असे सांगितले. त्यानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला.”
एका खासदाराने साहित्य संमेलनात येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिल्यानंतर संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले होते. त्या खासदाराने ते पैसे दिले. परंतु, कार्यक्रम जवळ आल्यावर आणखी तीन लाख रुपये मागितले गेले. कार्यक्रमात येण्यासाठी लता मंगेशकर पैशांच्या मागणीवर अडून राहिल्या, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.
नेहरू यांच्यासमोर गायनाचा कार्यक्रमही मोफत नाही
याशिवाय, जेव्हा जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायनाचा कार्यक्रम ठरला होता, तेव्हा निमंत्रण आशा भोसले यांच्यासाठी होते. लता मंगेशकर यांना निमंत्रण नव्हते. मात्र, लता मंगेशकर यांनी तिथे गायन केलं. तिथे ही मानधन घेऊन गायन केलं. नेहरूसमोरचे त्यांचे गायन मोफत नव्हते. हे रुग्णालय आमदाराच्या पीएकडून दहा लाख रुपये मागत असतील. तर हे धर्मादाय रुग्णालय कसे? गरिबांसाठीचे हॉस्पिटल कसे?, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
सातवा फ्लोर मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव
“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सातवा फ्लोर मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव आहे. हे धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा तपासणीसाठी 20 रुपये ऐवजी 600 रुपये घेतात. ही लूट नाही का? सातवा माळा मंगेशकर कुटुंबीय आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी राखीव का?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
“तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणात काल आलेला तिसरा अहवाल मन हेलावून टाकणार आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. उपचार न देऊन तिचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये, मग तो कितीही मोठा माणूस असो, कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. माझ्यावर टीका केली जात असली तरी मला त्याची चिंता नाही,” असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
हेही वाचा:





