यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर; उद्योग क्षेत्रातील ‘या’ व्यक्तीला करणार सन्मानित

Lata Mangeshkar Award | आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासातील योगदानासाठी जाहीर करण्यात आला आहे.
दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही जाहीर
याशिवाय संगीत, नाटक, साहित्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभावी योगदानाबद्दल श्रद्धा कपूरला, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुनील शेट्टी, अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अभिनेते शरद पोंक्षे यांनाही सन्मानित केले जाणार आहे.
व्हायोलिनवादक पद्मभूषण डॉ. एन. राजम यांनाही सन्मानित केले जाणार आहे. श्रीपाल सबनीस यांना त्यांच्या वक्तृत्वपूर्ण आणि चिरस्थायी साहित्यिक योगदानासाठी वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तर स्क्रिप्टिस क्रिएशन आणि रंगाई प्रॉडक्शन यांच्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला नाट्य क्षेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन’ या सामाजिक संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. Lata Mangeshkar Award |
पुरस्काराचे वितरण मोहन भागवत यांच्या हस्ते होणार
दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या स्मृतिदिनानिमित्त २४ एप्रिलला विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२२ मध्ये सुरू केलेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कुमार मंगलम बिर्ला यांची कामगिरी
कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील बड्या उद्योगपतींपैकी एक आहेत. आदित्य बिर्ला समूहाचे चौथ्या पिढीचे ते प्रमुख आहेत. वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी १९९५ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी कंपनीची जबाबदारी हाती घेतली. ज्यानंतर त्यांनी कंपनीला यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी मोठी मेहनत घेतली.
हेही वाचा:





