अबाऊट टर्न : तयारी

देशातल्या बहुतांश तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक बंदीवानांना ठेवण्यात आलंय. काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेच्या दुप्पट संख्येनं बंदीवान आहेत. बऱ्याच ठिकाणी महिलांसाठी जे स्वतंत्र कक्ष असतात, तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे, कच्च्या कैद्यांची संख्या अधिक असणं हे तुरुंगांमधील गर्दीचं एक प्रमुख कारण सांगितलं जातं.
गंभीर गुन्हे वगळता ज्या गुन्ह्यांमध्ये जामीन होणं शक्य आहे, अशा गुन्ह्यातील लोकही अनेक कारणांमुळे जामीन घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे तुरुंगातली गर्दी वाढत जाते. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात सध्या वेगळीच “तयारी’ सुरू असल्याचं समजतंय. तुरुंगाच्या ज्या भागात कैद्यांची फारशी गर्दी नसते, म्हणजे जो भाग तुरुंगाच्या मुख्य भागापासून थोडा दूर आहे, अशा ठिकाणी नऊ व्हीआयपी बराकी उभारल्यात म्हणे!
हल्ली व्हीआयपींच्या तुरुंगवाऱ्या खूपच “कॉमन’ झाल्यात; पण बाहेरच्या जगाला हे चित्र जेवढं सवयीचं झालंय, तेवढं अजून तुरुंगाच्या भिंतींना झालं नसावं. म्हणून मग आता “ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर’ असलेल्या नऊ बराकी उभारल्यात. इथल्या कैद्यांना पंखा आणि टीव्हीचा लाभ घेता येतो. शिवाय झोपायला गादी मिळते, बेडशीट मिळतं, उशी मिळते आणि मेलामाइन क्रोकरीसुद्धा वापरायला मिळते म्हणे! असे हे नऊ “व्हीआयपी कक्ष’ सजलेले असताना तिथं जाण्यासाठी आता कुणाचा नंबर लागणार, याची चर्चा होणं स्वाभाविकच आहे.
काहीजणांच्या मते, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यावर लवकरात लवकर खटला चालवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी या मंडळींना ब्रिटनमधून भारतात आणलं जाणं अत्यावश्यक आहे. काही वर्षांपूर्वी “भारतातल्या तुरुंगांमध्ये सुविधा नाहीत,’ असा युक्तिवाद करून या धनाड्यांनी प्रत्यार्पणाला नकार दिला होता. बऱ्याच जणांना ही बाब खटकली होती, कारण या मंडळींनी गुन्हा भारतात केलाय आणि त्यांना भारताच्या ताब्यात देण्याइतके भारतातले तुरूंग “सक्षम’ आहेत की नाही, हे ठरवण्याची विनंती या मंडळींनी परदेशांतल्या न्यायालयांना करणं, हाच अनेकांना मोठा विनोद वाटला होता. पण तरीसुद्धा आर्थर रोड तुरुंगातल्या काही “सुसज्ज’ बराकींचे फोटो, व्हिडिओ तिकडच्या कोर्टात पाठवण्यात आले होते.
आता नव्यानं तयार झालेल्या बराकींमध्ये हेच दोन “पाहुणे’ प्रामुख्यानं येण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु राजकारणातल्या उलथापालथी आणि तपास यंत्रणांची सक्रियता विचारात घेता नव्या बराकींमध्ये येऊ घातलेले पाहुणे राजकीय क्षेत्रातलेही असू शकतात. नऊमधल्या दोन बराकी मल्ल्या, नीरव यांच्यासारख्या आर्थिक गुन्ह्यातल्या आरोपींसाठी राखून ठेवल्या तरी उर्वरित सात बराकींमध्ये कोण येणार, ही उत्सुकता आहेच. त्यामुळे काही राजकीय व्यक्तींच्या बाबतीत तपास यंत्रणा आणखी वेगानं कामाला लागल्या असाव्यात, असाही अंदाज आहे.
तुरुंगातली गर्दी वाढत चाललीये आणि जागेची कमतरता भरून काढायची आहे, एवढीच कारणं सांगितली जातायत. परंतु जागेची कमतरता भरून काढायची असती, तर “जनरल’ बराकी वाढवल्या असत्या, असं माहीतगारांचं म्हणणं आहे. म्हणूनच “आता कुणाचा नंबर लागणार,’ हा प्रश्न काहींच्या मनात वारंवार येतोय. काही बड्यांच्या पाहुणचाराची तयारी पूर्ण झालीये, एवढं मात्र खरं.





