अमृतकण : सर्वात मी

एक सत्संग संपला. आरती झाली आणि मग महाराजांनी सर्वांना आपल्या मागोमाग एक प्रार्थना म्हणायला सांगितली. महाराज एकेक ओळ सांगत होते आणि हात जोडून डोळे मिटून प्रत्येकजण ती प्रार्थना म्हणत होता. “हे देवा! सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं भलं कर आणि तुझं गोड नाम माझ्या मुखात सदैव राहू दे.’
प्रार्थना प्रसाद झाला, हळूहळू गर्दीही ओसरली. एक व्यक्ती मात्र अजून तिथेच घुटमळत होती. त्या व्यक्तीस पाहून महाराजांनी त्यास विचारले, “”का रे बाबा, काय झालं? तुला काही हवंय का? काही विचारायचं आहे का?”
त्यावर ती व्यक्ती “होय’ असं म्हणाली. त्यावर महाराज म्हणाले, “”विचार ना. हे बघ शंका मनात ठेवून कोणतीही गोष्ट करू नये. तिचा फायदा होत नाही. बरं काय आहे तुझी शंका?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, “”महाराज तुम्ही आता जी प्रार्थना म्हणायला सांगितली त्यात देवाकडे सुख मागताना, भलं कर म्हणताना ते तुम्ही सर्वांसाठी मागायला सांगितलंत, होय ना?” “”होय” महाराज म्हणाले. “”मग तुझं नाम माझ्या मुखी राहू दे हे मात्र स्वत:पुरतंच का मागायचं?” त्याने विचारले.
त्यावर काहीसे हसत स्वामी म्हणाले, “”हे बघ जेव्हा आपण देवाकडे सुख आणि समाधान हे सर्वांना दे असं मागतो ना त्या सर्वात आपलाही समावेश असतोच की. पाऊस सगळ्यासाठी पडतो, नदी सर्वांसाठी वाहते, वारा सर्वांसाठी आहे, होय ना. तसंच सुख आणि समाधान हे प्रत्येकजणच शोधत असतो. आता प्रत्येकाच्या सुखा-समाधानाच्या जागा, कल्पना वेगळ्या असतात; पण त्या मागची भावना ही एकच असते. तिथे भावनेला महत्त्व आहे.
आता देवाकडे तुझं गोड नाम माझ्या मुखात सदैव राहो, असं का मागायचं म्हणशील तर इथे कुणाला राम आवडतो तर कुणाला कृष्ण, कुणाला शंकर तर कुणाला देवी. बरं, देवाची नावं तरी किती असंख्य. आता ज्याचं जे उपास्य दैवत असेल तो त्याचेच नाव घेणार! होय की नाही? मी कोणाचं नाव घेतलं किंवा कोणतं नाव घेतलं याला महत्त्व नसतं तर ते असतं, त्या ईश्वराचं जे अस्तित्व आपण मानतो ना त्याला. म्हणून इथे माझ्या आणि तिथे सर्वांचा असा विचार करायचा असतो, हेच या मागणी मागच गमक आहे.”





