अबाऊट टर्न : पूल

-हिमांशू
पूर्वीपासूनच खचलेला एक पूल करोनामुळे आणखी खिळखिळा झालाय. पुलाच्या दोन्ही बाजूकडची माणसं पूर्वी एकमेकांना किमान पाहू शकत होती; दिसू शकत होती. आता दोन्ही विश्वातली माणसं एकमेकांच्या नजरेआड गेलीत.
तंत्रज्ञानाने जवळ आणलेले जग विषमतेने दुभंगलंय. इंटरनेटच्या माध्यमातून जगातले कोणतेही ठिकाण क्षणार्धात डोळ्यापुढे आणू शकण्याच्या या काळात जगाचा एक मोठा तुकडा कायमचा दृष्टिआड जाईल की काय, अशी भीती वाटू लागलीय. माणसा-माणसातल्या या जीर्ण झालेल्या पुलाची आठवण करून दिली ती बिहारमधल्या एका खास पुलाने. हा पूल सरकारने किंवा बीओटी तत्त्वावर एखाद्या कंत्राटदाराने बांधलेला नाहीये. हा पूल एका अगतिक बापाने त्याच्या लेकासाठी बांधलाय.
रामनगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातल्या या बापाला त्याच्या मुलाचे लग्न करायचं होतं. लग्न खरं तर आधीच ठरलेलं होतं; पण करोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि लग्न बारगळलं. गावातलं संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यावर वधू-वरांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर मोठा पाऊस आला. गावाजवळची नदी दुथडी भरून वाहू लागली. लग्न पुन्हा रद्द होतंय की काय, अशी धास्ती वरपित्याला वाटू लागली. मग त्याने नदीवर बांबूचा पूल बांधायला सुरुवात केली. डोक्यावर पगडी बांधलेला नवरदेव पॅंट दुमडून, बूट हातात घेऊन या पुलावरून पलीकडे गेला. मग वऱ्हाडी मंडळींनी नदी ओलांडली.
बापाने मुलाच्या लग्नासाठी स्वतःच्या हाताने बांधलेला हा पूल अनेक अर्थांनी सूचक ठरतो… आणि नदीला आलेला पूरसुद्धा! या गावात केंद्राच्या योजनेतून पूल बांधायला परवानगी मिळालीय; पण काम सुरू झालेलं नाही. ग्रामीण भागातली अशी असंख्य अविकसित ठिकाणं आपल्या प्राधान्यक्रमात आधीपासूनच नव्हती. आता करोनामुळे त्यांचा प्राधान्यक्रम आणखी खाली घसरला. करोनाच्या काळात जेव्हा संपूर्ण उद्योगविश्व थंड होतं; शहरं शांत होती तेव्हा ग्रामीण भागातला शेतकरी राबत होता.
जीडीपीचे सगळे आकडे “उणे’ झाले तेव्हा एकटी शेतीच “प्लस’मध्ये होती. पण करोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा विषय जेव्हा जेव्हा चर्चिला जातो, तेव्हा तेव्हा प्राधान्यक्रमाने उद्योगांचा आणि बड्या शहरांचाच विचार होतो. वास्तविक, पुलाच्या दुसऱ्या बाजूला वेगळीच सृष्टी दिसते. या सृष्टीत भारतातले श्रीमंत करोनाकाळात परदेशांत मालमत्ता खरेदी करताना दिसतात. त्याची आकडेवारी छापून येते. या मंडळींचं गुंतवणुकीचं फेव्हरेट ठिकाण दुबई आहे म्हणे! दुबईतल्या हजारो मालमत्तांचा सौदा करोनाकाळातही सुरू आहे आणि संयुक्त अरब अमिरातीमधील खरेदीदारांच्या खालोखाल संख्या आहे ती भारतीय खरेदीदारांची! गुंतवणूक नेहमी चांगल्या “रिटर्न्स’साठी केली जाते आणि जगातल्या अन्य शहरांपेक्षा दुबईत घरांना भाडं जास्त मिळतं म्हणून भारतीयांची दुबईला पसंती आहे.
दुबईत रहिवासी परवाना मिळवायचा असेल तर तिथं प्रॉपर्टी खरेदी करणं हा सगळ्यात जवळचा मार्ग मानला जातो. शिवाय रेंटल यील्ड म्हणजे भाड्यातून मिळणारं उत्पन्न दुबईत सर्वाधिक आहे. शिवाय हल्ली परदेशी व्यक्तींना दुबईत स्थानिक भागीदार न घेता, स्वतःचा व्यवसाय करता येतो. थेट परदेशांत गुंतवणूक करणारे भारतीय आणि ज्यांच्यावर काडीची गुंतवणूक झालेली नाही, असे भारतीय यांच्यातला पूल आता बिहारमधल्या अगतिक बापाने मुलासाठी बांधलेल्या बांबूच्या पुलाइतकाच जीर्ण झालाय.





