अबाऊट टर्न : बेपत्ता

-हिमांशू
रुमालासारखी छोटीशी गोष्ट सापडेनाशी झाली तरी आपण अस्वस्थ होतो. पैशांचं पाकीट वगैरे दिसेनासं झालं तर भलतेच कासावीस होतो; कारण आजकाल सगळी “हुकमी कार्ड’ आपल्या पाकिटातच असतात. तरीसुद्धा पाकीट हरवलं तर एकवेळ चालेल; पण मोबाइल हरवता कामा नये, असं म्हणणारे लोक आपल्याकडे आहेत.
मोबाइल काही वेळासाठी जरी नजरेसमोरून गायब झाला तरी अनेकांना अक्षरशः वेड लागतं. कधीकधी अशी भीती वाटते की, आपल्याला आपल्याच प्रेमात बुडवून टाकणारा हा मोबाइल एखाद्या वेळी इतका महत्त्वाचा ठरेल, की जवळचा माणूस गायब झाला तरी मोबाइल हरवल्यावर बसतो तेवढा धक्का बसणार नाही. आता हेच पाहा ना, एक महत्त्वाचा माणूस दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे आणि कुणालाच त्याचं विशेष काही वाटत नाहीये.
चिनी फोनवरून आत्मनिर्भरतेचे मेसेज पाठवणाऱ्यांनासुद्धा चीनमध्येच घडलेल्या या घटनेचं गांभीर्य फारसं जाणवलेलं दिसत नाही. माणूस साधासुधा नाहीये. अब्जाधीश आहे. जगातल्या मोजक्या श्रीमंतांच्या यादीत त्याचं नाव आहे. गेल्या दोन महिन्यांत ते थोडं खाली आलंय, एवढंच! “अलिबाबा’ नावाच्या अब्जावधींची उलाढाल करणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीचे मालक जॅक मा हे 10 ऑक्टोबरपासून कुणालाच दिसले नाहीत, असं सांगितलं जातंय. सामान्यतः अशा व्यक्तींना असणारं सुरक्षाकवच आणि अन्य बाबी पाहिल्यास ही चर्चा इतक्या उशिरा सुरू झाली, हेच नवल!
चीनमध्ये माणसं गायब होणं काही फारशी असामान्य गोष्ट नव्हे. तिथले राज्यकर्ते जादूगार आहेत. त्यांच्या विरोधात कुणी बोललं किंवा त्यांच्या धोरणाबद्दल कुठे शब्द काढला की लगेच जादूची कांडी फिरते आणि माणूस गायब होतो. चिनी सरकारवर टीका करणारे रेन शिंगियांग असेच गायब झाले. नंतर बातमी आली की त्यांना 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालीय. कोविडच्या प्रसारासंबंधी इशारा देणारा डॉक्टर तर मरण पावला. साथीच्या काळातलं व्यवस्थापन अयोग्य होतं असं सांगणारी पत्रकार झांग झान हीसुद्धा अचानक गायब झाली.
या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांच्याच संमेलनात चिनी राज्यकर्त्यांच्या व्यापारविषयक धोरणावर नकारात्मक बोलणारा माणूस अपवाद कसा असेल? तो अब्जाधीश असला म्हणून काय झालं? आता चर्चा सुरू झाली तेव्हा “पीपल्स डेली’ या चीनच्या सरकारी वृत्तपत्रानं माहिती दिली की, जॅक मा हे एका “अज्ञात स्थळी’ सुखरूप वगैरे आहेत. ते “देखरेखीखाली’ आहेत, असंही प्रसिद्ध झालंय. आजारी माणूससुद्धा “देखरेखीखाली’ असतो आणि समाजकंटकही “देखरेखीखाली’ असतात, त्यामुळे एवढ्या त्रोटक माहितीवरून नेमकं काय समजायचं? जॅक मा गायब होणं “सरकारी’ आहे, हे मात्र स्पष्ट झालं. आता ते “देखरेखीखाली’ का आहेत, एवढंच पाहावं लागेल.
सरकारवर टीका करणारी माणसं गायब होतात, हे चीनमधलं उघड गुपित आहेच; परंतु त्यापलीकडेही एक शंका नुकतीच व्यक्त केली जाऊ लागलीय. सध्याच्या काळातलं सर्वोत्कृष्ट हत्यार म्हणजे “डेटा’! जॅक मा यांची ई-कॉमर्स कंपनी असल्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांचा पुष्कळ डेटा आहे आणि चिनी सरकारला तो हवा आहे, अशी ही शंका आहे. चिनी बॅंका आणि नियामक यंत्रणेवरची टीका मा यांना महागात पडली, की हा डेटासंघर्ष आहे, या प्रश्नाचं उत्तर जगासाठी महत्त्वाचं!





