पुणे जिल्हा : दूध अनुदानाची घोषणा हवेतच विरली?

ऑक्टोबर, नोव्हेंबरचे प्रतिलिटर सात रुपये अद्यापही उत्पादकांच्या खात्यात जमा नाही
वाल्हे – मागील दोन वर्षांपासून गायीच्या दूधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यांतील काही दिवसांचे पाच रूपये प्रतिलिटर दूध अनुदान तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील 7 रुपये दूध अनुदान रक्कम खासगी व शासकीय दूध संघाकडून अद्यापपर्यंत दूध उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यात आले नसल्याने शासनाकडून घोषणा होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी संपत आला तरी देखील आजअखेर खासगी, शासकीय दूध संघाला दूधपुरवठा करणारे, दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असल्याने शासनाची घोषणा हवेतच विरली का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दूध उत्पादक शेतक-यांना खासगी व सहकारी दूध संघ 30 रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर 35 रुपयांची दराची घोषणा शासनाकडून जून महिन्यात करण्यात आली होती दरम्यान, पाच रुपये दूध अनुदान रक्कम तब्बल साडेतीन महिन्यांनंतर दस-यांच्या नंतर दूध उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, अनुदान पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट पूर्ण महिन्यांतील दूध अनुदान रक्कम जमा झाली. तसेच सप्टेंबर महिन्यांतील काहीच दिवसांची अनुदान रक्कम जमा झाली होती.
यानंतर सप्टेंबर महिन्यांतील मंत्रीमंडळ बैठकीत नव्या निर्णयानुसार दूध संस्थांना 28 रुपये दर देण्याचा निर्णय झाला होता. तर सात रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता. सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकर्यांना 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ या गुणप्रतिकरिता किमान 28 रुपये प्रतिलिटर इतका दर 1 ऑक्टोबरपासून दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर देणे बंधनकारक होता.
त्यानंतर सरकार सात रुपये अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा करणार होते. मात्र अनुदान उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यात आले नसल्याने शासनाकडून घोषणा होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी संपत आला तरी देखील आजअखेर खासगी, शासकीय दूध संघाला दूधपुरवठा करणारे, दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असल्याने आगोदरच तोट्यात सापडत असलेला दूध उत्पादक शेतकर्यांला आर्थिक चणचण जाणवत आहे.
मागील वर्षापासून पुरंदर तालुक्यातील काही गावांत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पशुधन सांभाळणे जिकरीचे होत असून दावणीचे जनावर फक्त जागविण्यासाठी पशुपालक धडपडत आहेत.आगोदरच शासनाकडून दूधास जाहीर केलेला दर परवडत नसल्याने,दूध व्यवसाय परवडत नाही. शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील प्रतिलिटर अनुक्रमे पाच ते सात रुपये दूध अनुदान रक्कम अद्याप मिळाले नसून शासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरेल का?
– जयवंत भुजबळ, दूध उत्पादक वाल्हे
शासनाकडून जाहीर केलेले 1 जुलै पासूनचे प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान रक्कम जुलै, ऑगस्ट महिन्यांतील पात्र दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यांतील काही दिवसांचे दूध अनुदान रक्कम तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील दूध अनुदान कात्रज सहकारी दूध संघाच्या दूध उत्पादन बळीरजाच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यांतील पहिल्या आठवड्यापासून जमा होण्यास सुरूवात होईल.
– तानाजी जगताप, संचालक, कात्रज सहकारी दूध संघ





