67 वर्षांपूर्वी प्रभात : बुधवार, ता. 7 माहे ऑक्टोबर सन 1954

“भारताचा शोध’ अपूर्णच राहणार! – पं. नेहरू
आय्. एन्. एस्. दिल्ली, ता. 6 – “”दिल्ली नौकेवरील तीन दिवसांच्या माझ्या वास्तवाने “भारताचा शोध’ यात एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे व ते प्रकरण माझ्या स्मृतिपटलावरून कधीही पुसले जाणार नाही,” अशा आशयाचे उद्गार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आज काढले.
“दिल्ली नौकेवरून मुंबई बंदरांतील “गेट वे ऑफ इंडिया’त पाय ठेवण्यापूर्वी त्यांनी भारतीय आरमारी सैनिकांना उद्देशून आज सकाळी भाषण केले. त्या वेळी ते म्हणाले, “”भारताच्या शोधाची पवित्र जबाबदारी मी काही दिवसांपूर्वी स्वशिरावर घेतली आहे. मी देशात खूप प्रवास केला आहे, कोट्यवधी लोकांशी बोललो, त्यांच्याशी जिव्हाळ्याची नाती जोडली, पण सारा भारतखंड काही मला उमजला नाही. माझा “भारताचा शोध’ कधी पुरा होणार नाही, एवढा मोठा माझा देश आहे.
मुंबईत गलिच्छ वस्त्या पाहून पंडितजी भडकले
मुंबई, ता. 6 – मुंबईत गलिच्छ वस्त्यांची वाढच होत असलेली पाहून पंतप्रधान नेहरू आज चांगलेच क्रोधाधिष्ट झाले व म्हणाले, “”या वस्त्या जाळून भस्म केल्या पाहिजेत. तेथील घरमालकांना तुरूंगात धाडले पाहिजे. या लोकांना काहीही नुकसान भरपाई न देता तुरूंगात घालावे. मुंबई म्यु. कॉर्पोरेशनच्या 18 कोटींच्या पणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करताना पंडितजी बोलत होते.
ते म्हणाले, “”शहरांतील गलिच्छ वस्त्या काढून टाकल्या पाहिजेत. तसे करण्यात काही अडचण असेल तर घटनेच्या तरतुदी बदलून घेतल्या पाहिजेत. ब्रिटनमध्ये गलिच्छ वस्तीतील जागेच्या मालकांना काही नुकसान भरपाई देत नाहीत. आमच्याकडेच ही अनिष्ट मागणी होत आहे.”
“”खेड्यात तरुणांना पाठवून खेडेगावच्या सर्वांगीण जीवनाची त्यांनी माहिती घेतल्यावाचून समाजसेवा फलदायी ठरणार नाही. खेडेगावचे जीवन जवळून पाहिल्यावाचून त्यांना जनसेवा करण्याचा मार्गच दिसणार नाही,” असे ते म्हणाले.





