67 वर्षांपूर्वी प्रभात : संयुक्त महाराष्ट्रातून विदर्भ, नागपूर फुटून निघणार?

नागपूर, ता. 28 – मुंबई, हैदराबाद आणि मध्यप्रदेश राज्यांतील मराठी भाषिक प्रदेशांच्या प्रतिनिधींच्या परिषदेत संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबाबत अद्यापी एकमत झालेले नसल्याचे वृत्त आज येथे आले आहे. याप्रकरणी चौकशी करता संयुक्त महाराष्ट्राला नागपूरचा संपूर्ण विरोध असल्याचे बैठकीत दिसून आले. वऱ्हाडच्या नेत्यांची वृत्ती दोलायमान असल्याचे दिसून आले. जोपर्यंत नागपूर-वऱ्हाड प्रदेश कॉंग्रेससमित्यांनी संयुक्त महाराष्ट्राबाबतचे आपले मत स्पष्ट केलेले नाही तोपर्यंत आपले हात बांधून घ्यायला ते नेते तयार नसल्याचे दिसले. याउलट दुसऱ्या टोकाला जाऊन काही नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पूर्ण पाठिंबा द्यावा अशी बाजू मांडली.
नागपूर प्रदेश कॉंग्रेस समितीचा संयुक्त महाराष्ट्रास कडवा विरोध आहे. वऱ्हाड प्रदेश कॉंग्रेसचे दोन तट आहेत. डॉ. खेडकर बहुमत मिळवू शकतात की काय ते पाहायचे. नागपूरला मान्य नसेल तर आपणही मुंबईच्या नेत्यांशी करार करू नये, असे वऱ्हाडच्या नेत्यांना वाटते.
आरोग्यमंत्री कन्नमवार म्हणाले, “”गेल्या आठवड्यात दिल्लीस जाण्यापूर्वी मी अर्धा आणा संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूचा होतो; पण दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींशी चर्चा केल्यावर मात्र मी साडेसोळा आणे महाविदर्भाच्या बाजूचा झालो.”
तत्पूर्वी या कराराच्या मसुद्यावर नागपूर व वऱ्हाडच्या आमदारांनी शिक्षणमंत्री श्री. पु. का. देशमुख यांच्या निवासस्थानी चर्चा केली होती. त्या बैठकीत शंकरराव देव हे महाराष्ट्राचे नेते आहेत, अशा उल्लेखाला जबरदस्त हरकत घेण्यात आली. त्यानंतर श्री. देव यांना महत्त्व द्यायचे नाही असे या बैठकीत ठरले.
सुवेझ कालवा वाटाघाटीत अँग्लो-इजिप्शीयनांचे एकमत
कैरो – अँग्लो-इजिप्शीयन सरकारच्या सुवेझ कालव्यासंबंधी चाललेल्या वाटाघाटी समाधानकारकरीत्या संपत आलेल्या असून दोन्ही पक्षांना संमत असा एक तडजोडीचा मसुदा तयार होत आलेला आहे.
या वाटाघाटीतील तांत्रिक मुद्द्यासंबंधीची चर्चा सोमवारी सुरू झाली असून सुवेझ कालवा भागांतून ब्रिटिश सैन्य काढून घेतल्यानंतर येणाऱ्या अडचणींचे निराकरण कसे करावे, यासंबंधी चर्चा चालू झाली आहे. तिसरे महायुद्ध चालू झाले तर सुवेझ कालव्याचे संरक्षण कसे करावे यावर एकमत झाले नाही, असे कळते.





