62 वर्षांपूर्वी प्रभात : डच तंबाखू मळ्याचे राष्ट्रीयीकरण होणार

शिष्टमंडळांचा खर्च कमी करण्याचा आदेश
नवी दिल्ली, ता. 25 – परदेशी पाठविण्यात येणाऱ्या सरकारी शिष्टमंडळ सदस्यांची संख्या शक्य तेवढी कमी करावी, असा आदेश पंतप्रधान पं. नेहरू यांनी दिला आहे, असे अर्थ खात्याचे उपमंत्री भगत यांनी आज लोकसभेत निवेदन केले. परदेशी हुंडणावळीचा खर्च कमी व्हावा या दृष्टीने शिष्टमंडळाची कसून पाहणी करूनच ती पाठविण्याचे कार्य अर्थखाते करीत आहे असे त्यांनी निवेदन केले.
अश्रुधुराने असेंब्लीच्या डोळ्यात अश्रु!
शिलॉंग – काल आसाम विधानसभेविरोधात निदर्शने करणाऱ्या मजूर संघाच्या निदर्शकांवर पोलिसांनी अश्रुधूर सोडून पांगवले पण विधानसभेत बसलेल्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांना त्याची झळ पोचली. सर्व असेंब्लीच डोळे पुसत होती. फक्त चष्मेवाले सभासद यातून वाचले. राज्यपालांनी रडारड पाहून आपले भाषण आवरते घेतले.
भारत-पाक वाटाघाटी यशस्वी होण्याची फारशी आशा नाही
कराची – पश्चिम पाक सरहद्दीवरील हुसेनीवाला सुलेमंकी बंधाऱ्यापाशी जे अनुचित प्रकार झाले त्या संबंधात मतभेद मिटवून तडजोड करण्याबाबत कराची येथे भारत-पाक प्रतिनिधींचे दरम्यान चालू असलेल्या वाटाघाटी यशस्वी होण्याची फारशी आशा नाही असे समजते. या बैठकीसंबंधी अधिकृत हकीगत बाहेर आलेली नाही पण वाटाघाटीची प्रगती निराशाजनक आहे असे माहितगार गोटांतून कळते.
डच तंबाखू मळ्याचे राष्ट्रीयीकरण होणार
जकार्ता – डच मालकीच्या 38 तंबाखूच्या मळ्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात येईल, असे इंडोनेशियन सरकारने जाहीर केले आहे. हॉलंडच्या ऐवजी ब्रेमेनकडे तंबाखूचा व्यापार वळवावा या धोरणास अनुसरून हे राष्ट्रीयीकरण करण्यात येत आहे. इंडोनेशियातील मळ्यातून तंबाखू खरेदी केली तर याद राखा असा इशारा युरोपीयन कंपन्यांना डच तंबाखू कंपन्यांनी दिला आहे.





